आरती सप्रेम …

               जी आर्ततेने केली जाते ती आरती आणि जे श्रध्देने केलं जातं ते श्राद्ध! अशी आरतीची व्याख्या मी वाचली आणि ऐकलीही होती. आरती ही ओवाळली जाते. याचा अर्थ असा की तिला चक्राकार लय असावी. ती आळवलीही जाते. एकेक चरण पुन्हा पुन्हा घोळून म्हटलेही जातात. याचाच अर्थ आवर्तन हाही तिचा सहजभाव असावा. आरत्या म्हणताना साथीला केवळ तबला पेटीच नव्हे तर झांजा(टाळाएवढ्या भक्कम नव्हेत हं! घनवाद्यांतला हा प्रकार अंमळ नाजूक आहे.) शंख, घंटा, तास इत्यादी वाद्यांसकट अगदी साग्रसंगीत अशी केली जाते. तिचा आवाज दरीभर गर्जून तो भाग अगदी दुमदुमून जातो. तशीच ती रोजच्या देवपूजेत फक्त छोट्याशा देवघंटिकेच्या साथीनेही केली जाते. जी फक्त देवांनाच ऐकू येत असावी! नुसत्या टाळ्या वाजवूनही आरती म्हटली जाते. आरती ही उभं राहूनच करण्याची पद्धत आहे तरीही महालक्ष्मीची पूजा, मंगळागौरीची पूजा अशावेळी फक्त महिला आरती करतात तेव्हा ती मुख्यतः बसूनच केली जाते. मध्यभागी असलेल्या तबक किंवा ताह्मनात प्रज्ज्वलित निरांजनं आणि कर्पुरारती अक्षतांवर स्थापित केलेली असते. ते तबक सर्वजणी उजव्या हाताने उचलून धरतात आणि अगदी हलकेच ते हलवीत त्या लयीवर गोड आवाजात कितीतरी सुंदर आरत्या म्हटल्या जातात. हे आरतीचं कौतुक भारतात सर्वत्र आहे. वाराणसीत गंगाकिनारी मोठ्या थाटामाटात आणि धूमधडाक्यात केली जाणारी गंगामैयाची आरती तशीच नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर केली जाणारी नर्मदा मातेची आरतीही प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये केली जाणारी आरतीही अशीच दणदणीत असते. घनवाद्यांचा सढळ हस्ताने वापर हे त्यांचं वैशिष्ट्य! भली मोठी घंटा, दांडगा टोल, शंख वगैरे भक्कम भक्कम मंडळी आपला जीव ओतून वाजत असतात. हे सगळं काही आपण पाहत असतो. ऐकत असतो आणि करीतही असतो. फक्त आपण सारेजण एकच गंमत विसरलेले असतो. ती म्हणजे आरती हा गायन प्रकार आहे. संगीत म्हटल्यानंतर त्यात शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत असे जे प्रकार येतात त्यापैकी आरती हा बऱ्याच अंशी अभिजात संगीतावर आधारित असलेला सुगमगायन प्रकार आहे.

          हे म्हटल्यावर आपल्या लक्षात येईल की आपण अगदीच गाणं म्हणत नाही असं काही नाही. तुम्ही गाण्याकडे कितीही दुर्लक्ष केलंत तरी जाल तिथे गाणं अविरतपणे तुमच्या मनावर सावली धरून येतं ते असं. आरती हा गायन प्रकार तसा जुनाचं. कारण कितीतरी जुन्या आरत्या या संतकवींनी लिहिलेल्या आढळतात. कुणी लिहिल्या ते ओळखणं खूप सोपं. आरतीची शेवटची ओळ पहावी. अभंगाप्रमाणेच तिथे नाममुद्रिका आढळेल. उदा. आपली सुखकर्ता दुःखहर्ताच घेऊ. त्या आरतीमध्ये शेवटच्या कडव्यात ‌‘दास रामाचा वाट पाहे सदना‌’ अशी ओळ आहे. त्यातला दास रामाचा म्हणजेच समर्थ रामदास स्वामी होत. तसंच विष्णुदास नामा यांनी लिहिलेल्या आरत्या. त्यांनी रचलेली रामाची आरती तर सर्वांगसुंदर आहे. रामाची अलंकारमंडित मूत आणि रामरायाचा सगळा परिवार अगदी डोळ्यांसमोर उभा राहतो.

  त्रिभुवनमंडित माळ गळा, आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा

  श्रीराम जय राम जय जय राम, आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम

  धृवपदाच्या या चार ओळी आरतीतला आर्तभाव दाखवायला पुरेशा आहेत. रामरायाला ब्रह्मपुतळा म्हणून मारलेली हाक किती म्हणून गोड असावी! तसंच मेघश्याम या सुरेख वर्णननामाचं वैशिष्ट्य! पावसाच्या ढगांचा श्यामवर्ण असलेला रामराया दिसलाच पाहिजे! हा झाला शब्दांचा सोहळा. आता वळू चालींकडे. तर कोकणातला समाज हा गानप्रिय आहे. शिवाय त्याच्याकडे अभिजात संगीताचा कान आहे याचा मजबूत पुरावा म्हणजे या आरत्यांना लावलेल्या नितांतसुंदर चाली. ‌‘त्रिभुवनमंडित‌’ची ती गोड चाल जेव्हा आमच्याकडच्या आरतीत ऐकायला मिळते तेव्हा आनंदाने डोळे बरसू लागतात. घशात आवंढा दाटून येतो. भावजागृती यालाच म्हणत असावेत का ते माहित नाही. ती आरती ऐकल्यावर आणखी एका गोष्टीसाठी वाईट वाटतं. ते अशासाठी की ती सांगतेची आरती आहे. गणपतीच्या दिवसांत कोकणात जेव्हा घरोघरी आरतीमंत्रपुष्प होतात तेव्हा आरत्यांच्या त्या जंगी कार्यक्रमामध्ये काही विशिष्ट आरत्याच समाप्ती करताना म्हटल्या जातात. त्यातलीच ही एक. आमच्या गावात ब्राह्मण समाजाची वस्ती भरपूर आहे आणि ते सर्वजणं पूवपासून आरती एक्स्पर्ट आहेत. त्यांनी केलेला आरतीमंत्रपुष्प अत्यंत श्रवणीय असतो.

  या आरत्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातल्या बहुतेक आरत्या चक्क रागांवर आधारित आहेत. काही काही आरत्या तर पूर्णपणे रागांमध्येच बांधल्या आहेत. ‌‘जय जय त्र्यंबकराज| गिरिजानाथा गंगाधरा हो‌’ ही त्र्यंबकेश्वर महादेवाची आरती,  ‌‘ऐकावी कथा हरि हो ऐकावी कथा, माझ्या राघवाची माझ्या माधवाची‌’ ही त्यातील उदाहरण. या आरत्या रीतसर ‌‘भैरव‌’ रागावर आधारित आहेत. ‌‘मंगलदायक सिध्दिविनायक‌’ ही गणपतीची आरती भीमपलासीवर आधारित आहे. ‌‘विघ्नांतक विघ्नेशा हे गजानना‌’ किंवा ‌‘राजगजानन गावा हो‌’ या आरती केदार रागावर आधारित आहेत. पैसाफंड गणेशमेळ्यासाठी त्यांच्या कवीने रचलेली आरती ‌‘हेरंब शिवकुलदीपका, तुज आरती गणनायका‌’ ही आरती रीतसर भैरवीमध्ये आहे. तोडू म्हटलं तरी तुटत नसलेली ही अभिजात संगीताची नाळ!

  कृष्णाच्या, विष्णूच्या आरत्या तर परमसुंदर म्हणाव्या अशा आहेत. ‌‘आरती भुवनसुंदराची‌’ किंवा ‌‘आरती करू संध्याकाळी ओवाळितो वनमाळी‌’ फार सुंदर आहेत. ‌‘आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म‌’ हा आरत्यांमधला बड़ा ख्याल असं पुलं त्यांच्या हरितात्या मध्ये म्हणून गेले खरे पण आमच्या गावात होणाऱ्या आरत्यांमध्ये अख्खा चतुरंग आहे. ‌‘आवडी गंगाजळी देवा न्हाणिले‌’ पासून सुरू होणारा चतुरंग श्रीपांडुरंगाच्या आरतीपर्यंत येऊन थांबतो. त्याही आरत्या अनुक्रमे पिलु, काफी, मल्हार आणि थेट दुर्गा, खमाज या रागांशी लडिवाळे करतात. तो चतुरंग मी लहानपणापासून असंख्य वेळा ऐकत आलेली आहे. आता मला त्या चाली लावणाऱ्या संगीतज्ञ हस्तींविषयी अतिशय पूज्यभाव वाटतो. आम्हा लोकांना अभिजात संगीताची गोडी लावण्यात या आरत्यांचा सहभाग मोठा आहे यात शंकाच नाही. कारण आपण जे काही ऐकतो आणि जे पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं तो रागसंगीताच्या समृद्ध परंपरेचा एक भाग आहे हे अजिबात माहीत नसताना कानावर झालेले हे स्वरसंस्कार आहेत.

  स्त्रियांनीच करायच्या अशा खास मंगळागौरी, महालक्ष्मीपूजन किंवा हरितालिका पूजन यासाठीच्या आरत्या तर इतक्या सुंदर आणि वैविध्यपूर्ण आहेत की त्यासाठी एक स्वतंत्र लेखच मला लिहावा लागेल. त्याही अर्थात बऱ्याचदा रागसंगीतावरच आधारित किंवा जवळच्या चालींच्या असून अतिशय श्रुतिमधुर आहेत. शिवाय त्या निसर्गतः मधुर आवाजाच्या मालकिणी असणाऱ्या महिलावर्गाच्या गळ्यातून उमटतात. अधिकच गोड. घरातला सगळा पुरुषवर्ग कितीही लांब असल्याचं भासवत असला तरी आरती मनापासून ऐकतो. चित्रपटातही आरत्या भाव खाऊन गेलेल्या आढळतात. एकदम जुनी आठवण काढायची झाल्यास ब्रह्मचारी चित्रपटातली खास पं. रामभाऊ मराठे स्पेशल असलेली आणि गमकयुक्त सुरुवात असलेली ‌‘जय जय श्री बजरंग कपिवर श्री हनुमंता, नामस्मरणे गाता होसी तू त्राताऽऽऽ‌’ ही आरती आठवा. त्राताऽऽ वरची ती तान अशी सणसणीत भिंगरीसारखी फेकली आहे पंडितजींनी, की बुध्दिमताम्‌‍‍ वरिष्ठम्‌‍ असलेल्या त्या संगीतज्ञ मारुतरायांनी जोडलेले हात पं. रामभाऊंच्याच दिशेने असावेत असं वाटतं. (त्यात परत ते राम) मग ‌‘जय अंबे जगदंबे सकलांची माता‌’ ही आरती असो किंवा आता अजय-अतुल यांनी संगीत दिलेली ‌‘दुर्गे दुर्घट भारी‌’ या आरतीची नवीन चाल असो. मन भारून टाकतात. रेडिओवर असंख्य वेळा कानी पडणारी ‌‘अंजनीच्या सुता‌’ ही आरती तर अजरामर झाली आहे. आणि सगळ्यात भाव खाऊन जाते ती मात्र आमच्या स्वरसम्राज्ञी लताबाई मंगेशकर आणि मंडळी यांनी गायलेली ‌‘सुखकर्ता दुःखहर्ताच!‌’ त्यांनी ‌‘घालिन लोटांगण‌’ची चालही फार सुरेख दिली आहे. मनावर अधिराज्य गाजवणारी ही आरती जरी देवांसाठी असली तरी यातून सर्वसामान्यांना अभिजात संगीताची गोडी नकळत लावणाऱ्या तिच्या सर्व संगीतकारांबद्दल, ‌‘गाऊ त्यांना आरती‌’ असंच म्हणावं असं वाटतं.

– दीपदास, 7588971055

Leave a Reply

Close Menu