नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रे….

गणपती विशेष-

नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रे|

लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे॥

ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे|

अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रे॥

 

         गणपतीची आरती चालू होती. समोर आपल्या दिमाखदार मखरात गणपती विराजमान झाले होते आणि रंगीबेरंगी फुलांनी आणि पानांनी अधिकच प्रसन्न दिसत होते. माझ्या मनात विचार आला,“ गणपतीला ही ठरलेली फुले आणि पानेच का वापरत असावीत?“ आयुर्वेदाची  विद्यार्थिनी असल्यामुळे त्यावर विचार करायला सुरुवात केली आणि मग लक्षात आले की आपल्या रूढी परंपरा एक प्रकारे आपल्या निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहेत. आपले सण, उत्सव या निसर्गाच्या बदलत्या रूपावरच आधारित आहेत. संक्रांतीला थंडी असते त्यामुळे तिळ, गूळ अशा उष्ण पदार्थांचा वापर पदार्थांमध्ये केला जातो. दिवाळीत संपूर्ण शरीर रुक्ष बनते म्हणून तेल लावून अभ्यंगस्नान केले जाते. खाण्यात सुद्धा तेलकट पदार्थांची रेलचेल असते. श्रावण महिन्यात निरनिराळे उपवास, व्रत असतात. या काळात पचनशक्ती कमजोर झालेली असते. त्यासाठी लंघन हा उत्तम उपाय आहे. तर भाद्रपद महिन्यात गणपतीबाप्पाचे आगमन होते. हा वर्षा ऋतुचा काळ असतो. निसर्गाचा सृजनत्वाचा हा काळ! नाना तऱ्हेच्या वनस्पती या दिवसात आपल्या सभोवती उगवलेल्या दिसतात. त्यातील प्रत्येक वनस्पती ही आपल्या आरोग्याला उपयुक्त असणारी वनस्पती आहे. या वनस्पतींचा उपयोग माणसांना माहीती व्हावा म्हणून तर गणपतीला एकवीस प्रकारच्या पत्री अर्पण करत असतील. कोणती आहे ती पत्री-फुले आणि त्याचे उपयोग?

          * मधुमालती किंवा चमेली: उपयोग मुखरोगावर. * माका: केसांच्या वाढीसाठी उपयुक्त. * बेल: पचनशक्तीवर काम करणारे औषध. * दुर्वा: पित्तशामक आणि स्त्रियांच्या पाळीच्या आजारावर. * बोर: तापावर आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते. * धोत्रा: श्वसनाच्या आजारावर उपयोगी पडते. धोत्र्याचे बी विषारी असते. परंतु आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे त्याचे शुद्धीकरण करून वापरले तर अत्यंत उपयोगी असते. * तुळस: ही सद-ताप-खोकल्यावर उपयोगी पडणारी आणि परंपरागत वापरली जाणारी वनस्पती आहे. * शमी: ही अनेक रोगांवर उपयोगी पडणारी वनस्पती आहे. “शमयति रोगान्‌‍‍ इति“ असे हिचे वर्णन केले जाते. * आघाडा: हिचा उपयोग मुतखडा, अर्श (मूळव्याध) या रोगांवर तसेच अनेक स्त्रीरोगांवर होतो. * डोरली: ही वनस्पती दमा, खोकला यात वापरतात. तसेच रानभाजी म्हणूनही या दिवसात ही भाजी जेवणात केली जाते. * कण्हेर: ही वनस्पती अर्धांगवायू, पक्षाघात या आजारांमध्ये वापरतात. मात्र ही वनस्पती तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने वापरावी. योग्य पद्धतीने वापरली नाही तर त्याची विषबाधा होऊ शकते. * रुई: ही उत्तम कफनाशक आहे. तसेच पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करते. परंतु ही वनस्पती विषारी असल्याने मार्गदर्शकाच्या मदतीने आणि सल्ल्याने शुद्ध करून वापरावी. * अर्जुन: ही हृदयावर प्रभावी काम करणारी वनस्पती आहे. शिवाय त्यात नैसर्गिकदृष्ट्या भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते. *विष्णुक्रांता: म्हणजेच शंखपुष्पीचा उपयोग बुद्धी म्हणजेच स्मृतीवर्धक म्हणून होतो. * डाळिंब: पित्तशामक म्हणून वापरले जाते. तसेच जंत, जुलाब यावरही त्याचा उपयोग होतो. * देवदार: याचा उपयोग अनेक औषधांमध्ये केला जातो. याच्या तेलाचा उपयोग अनेक औषधांमध्ये करतात. ताप, जुना संधिवात यात हे उपयोगी पडते. * मरवा: ही एक सुगंधी वनस्पती आहे. शरीरातील अंतस्त्रावी ग्रंथांवर काम करते. * पिंपळ: या वृक्षाचे अनेक फायदे आहेत. अगदी वेदांमध्येसुद्धा या वनस्पतीचा उल्लेख सापडतो. * जाई: हिचा उपयोग जखमेवर किंवा जुन्या जखमांवर अतिशय उत्तम होतो. * केवडा: मूत्ररोगावर आणि डोके दुखत असल्यास याचा उपयोग होतो. * हादगा: नेत्रविकारावर ही वनस्पती अत्यंत उपयोगी पडते. हिच्यात जीवनसत्व अ मुबलक प्रमाणात असते. तसेच रानभाजी म्हणूनही या भाजीच्या फुलांपासून भाजी तयार करतात.

  या वनस्पतींशिवाय गणपतीला लाल जास्वंदीचे फूल आवडते.  जास्वंदीचे फूल हे पित्तशामक आहे. वर्षाऋतू हा पित्तप्रकोपाचा काळ मानला जातो. या काळात पचनशक्ती अधिकच कमकुवत होते. त्यामुळे योग्य काळजी घेतली नाही तर पित्तसंचय आणि कफप्रकोप व्हायला सुरुवात होते. जास्वंद ही निरनिराळ्या रोगांवर उपयोगी पडणारी वनस्पती आहे.

  अशाप्रकारे निसर्गातील जी सृष्टी आहे त्याचा परिचय या वनस्पतींच्या रूपात आपोआप होतो म्हणून या रूढी असाव्यात. या परंपरा फार पूवपासून वृक्षसंवर्धन करत आहेत. सुरुवातीला आरतीत म्हटले आहे की सर्व वनस्पती, मोदकाचा नैवद्य, मंत्रोपचार यांनी पूजा केली तर आपल्याला आठही सिद्धी प्राप्त होतील. वास्तविक या आठ सिद्धी योगशास्त्रात वर्णन केल्या आहेत. त्याचा अर्थ विशेष शक्ती किंवा असामान्य कौशल्य असा करता येतो. या आठ सिद्धी आहेत –

अणिमा: एखाद्याचे भौतिक स्वरूप अणूच्या आकारात कमी करणे.

महिमा : स्वतःचे शारीरिक स्वरूप अविश्वसनीयपणे मोठे करणे

गरिमा : स्वतःचे शरीर इतरांना अचल वाटेल इतके जड बनवणे.

लघिमा : जवळजवळ वजनहीन होणे.

प्राप्ती : जिथे जायचे तिथे जाण्याची/प्रवास करण्याची क्षमता असणे.

प्रकाम्य : जे हवे ते मिळवण्याची क्षमता असणे.

ईशित्व: स्वतःमध्ये ईश्वराचा अंश निर्माण करणे.

वशित्व : इतरांच्या मनावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असणे.

  आरतीत वर्णन केलेल्या या आठ सिद्धी आपण आरोग्याच्या दृष्टीने प्राप्त करू शकतो आणि त्यासाठी या वनस्पतींचा आपल्याला निश्चितपणे फायदा होऊ शकतो. थोडा वेगळ्या पद्धतीने विचार केला तर…

अणिमा : चुकीच्या जीवनशैलीमुळे, अयोग्य आहार विहारामुळे आज अगदी लहान वयापासून स्थूलता, मधुमेह या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बोर, अर्जुन या वनस्पती लठ्ठपणाची समस्या दूर करण्यास मदत करते.

महिमा : आपली बुद्धी, स्मरणशक्तीची क्षमता वाढवणे. शंखपुष्पीसारखी वनस्पती यासाठी उपयुक्त आहे. मरवा, केवडा आपल्याला सकारात्मक ऊर्जा देते.

गरिमा : आपली प्रतिकारशक्ती नेहमी उत्तमच राहील जेणेकरून कोणत्याही आरोग्याच्या समस्येला आपण सक्षमतेने तोंड देऊ शकू. पिंपळ, अर्जुन, शमी, देवदार, धोत्रा, आघाडा, माका या सर्व वनस्पती कोणत्या कोणत्या रुपाने आपली प्रतिकारशक्ती वाढवत असतात. तुळस ही ऑक्सिजनचा उत्तम स्रोत मानली गेली आहे.

लघिमा : आपले निरोगी आयुष्य हे बऱ्याचदा आपल्या आहारावर अवलंबून असते. रोजचा आहार हलका आणि आपल्या पचनशक्तीला योग्य असा घेणे गरजेचे असते. पण काही कारणाने त्यात बिघाड झालाच तर बेल, डाळिंब यासारख्या वनस्पती उपयुक्त ठरतात.

प्राप्ती आणि प्रकाम्य : जीवनात निरोगी आयुष्य प्राप्त करणे हे आपले ध्येय आणि इच्छा असली पाहिजे. त्यासाठी आपली जीवनशैली योग्य पद्धतीने आखली गेली पाहिजे. बेल, अर्जुन यापासून निर्माण केलेली औषधे आपल्याला हे ध्येय प्राप्त करण्यास मदत करतात. मानसिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी शंखपुष्पीसारखी वनस्पती मदत करते.

ईशित्व आणि वशित्व : आपल्या शरीर हे एकप्रकारचे यंत्र आहे. त्यातील वेगवेगळे अवयव हे त्याचे नियंत्रण करणारे कामगार आहेत. त्यांची कामे सुरळीत होण्यासाठी त्यांना योग्य आहार आणि विहार अर्थातच शारीरिक हालचाल किंवा व्यायामाची गरज असते. पण ईश्वराचा अंश (ईशित्व) म्हणजेच निरोगी शरीर आणि ते आपल्या नियंत्रणात ठेवणे(वशित्व) यासाठी पिंपळ, देवदार, दूर्वा , जास्वंद, बेल, हादगा, मरवा या वनस्पती मदत करत असतात.

        वास्तविक जेव्हा आपण आरोग्य आणि गणपतीला आवडणाऱ्या वनस्पती या दृष्टीने विचार करतो तेव्हा गणपतीचे हत्तीसारखे असणारे तोंड आणि इतर शरीर म्हणजे माणसाने कसे असू नये किंवा कसे असावे हे सांगणारे हे प्रतिक आहे आणि जे अयोग्य आहे ते योग्य करण्यासाठीच गणपतीला या वनस्पती प्रिय आहेत असे मानले जात असावे. गणपती हे ज्ञानाचे, बुद्धीचे प्रतीक आहे. हत्ती हा प्राणी किती हुशार असतो याची कल्पना सिंधुदुर्गवासीयांना वेगळी देण्याची गरज नाही. म्हणूनच स्मरणशक्ती वाढविणारी शंखपुष्पी गणपतीच्या पूजेत असावी. गणपतीचे कान सुपासारखे आहेत. सुपात धान्य घेऊन त्यातील कचरा साफ केला जातो. तसेच शरीरात निर्माण झालेल्या, आरोग्याला घातक गोष्टी बाजूला करून योग्य उपचार करणे हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. त्यासाठीही या वनस्पती पूजेत असाव्यात. गणपतीचे छोटे डोळे जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे सूक्ष्म नजरेने/बारकाईने बघावे हे सांगणारे प्रतिक आहे. आयुर्वेद पण हेच सांगतो की रोग निर्माण होण्यापेक्षा ते होऊच नयेत अशी जीवनशैली अंगिकारली पाहिजे. तोच दृष्टीकोन प्रतीक म्हणून असणारे गणपतीचे डोळे आपल्याला शिकवत असतात. उदा. जास्वंदीचा काढा किंवा चहा प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. बेलापासून तयार केलेला अवलेह पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करतो. गणपतीचे मोठे पोट म्हणजे जीवनात येणाऱ्या सर्व चांगल्या-वाईट गोष्टींना सहजपणे पचवण्याची ताकद देणारे प्रतीक आहे. त्यासाठी मनाची ताकद वाढवणे गरजेचे आहे. रक्तदाब, अस्वस्थता या समस्या मनाचा कमकुवतपणा दर्शवतात. तो नाहीसा करण्यासाठी जास्वंद, मरवा, केवडा उपयोगी ठरते. शिवाय वेगवेगळे रंग मनाची प्रसन्नता वाढवतात. म्हणूनही गणपतीच्या पूजेत या सर्व वनस्पतींना मानाचे स्थान असावे. गणपतीची लाल रंगांची कांती मन प्रसन्न करते. तशीच आमचीही त्वचा तजेलदार बनावी म्हणून जास्वंदीचा उपयोग होतो. अनेकदा रक्तदुष्टीमुळे त्वचाविकार होतात. त्यामध्ये जास्वंद, देवदार, आघाडा यांचा उपयोग केला जातो. त्याचे प्रतीक म्हणूनही कदाचित या सर्वांचे गणपतीपूजेत महत्व असावे. वक्रतुंड, एकदंत, महोदर, गजानन,लंबोदर, विकट,विघ्नराज आणि धुम्रवर्ण अशा आठ अवतारात गणपतीचे पुराणात वर्णन केले आहे. प्रत्येक अवतार हा असूराला नष्ट करण्यासाठीच निर्माण झाला. असूर म्हणजेच दुष्ट प्रवृत्ती! तशीच शरीरातील दुष्ट प्रवृत्ती म्हणजेच विकृती नष्ट करण्यासाठी या वनस्पतींचा उपयोग होतो. म्हणूनही कदाचित या सर्व वनस्पतींशिवाय गणपतीची पूजा होत नसेल. म्हणूनच गणेशपूजन म्हणजे एक प्रकारची निसर्गपूजाच आहे असे म्हणावे लागेल.

-डॉ. मेधा फणसळकर. माणगाव, ता.कुडाळ, 9423019961.

Leave a Reply

Close Menu