मुस्लिम बहुल देशात झाले श्रीगणेशाचे दर्शन

  घटना तशी फारशी जुनी नाही आणि ताजीही नाही. सन 2023 मध्ये जवळजवळ पंचवीस वर्षानी मी आपल्या मुळ गावी वेंगुर्ल्यात गणेश चतुथ साजरी करत होतो. पदोन्नतीने आपल्या जिल्ह्यात परतल्यावर गणपतीची प्रतिष्ठापना येथील नवीन वास्तुत करण्यास सुरुवात केली होती. घरात गणेश चतुथची गडबड चालू होती. अस्मादिक निवांत एका कोपऱ्यात बसले असतानाच मोबाईलवर एक टूर कंपनीचा मेसेज येऊन पडला. बाकू ट्रिप बद्दल जाहिरात होती ती. विमान प्रवासासह एकावर एक फ्री अशी ऑफर होती ती. प्रथम मी बुचकाळ्यात पडलो, हे बाकू नेमके आले कुठे? कारण भ्रमंती करणाऱ्यांकडून तोपर्यंत या बाबत कधी कुठे ऐकले नव्हते. खर सांगायचे तर मला बाकू परदेशात आहे हेही माहित नव्हते. गुगल सर्च केल्यावर बाकू अझरबैजान या देशातील एक शहर असल्याचे माहिती प्राप्त झाली.

  आता फिरायला जाण्यासाठी हे योग्य डेस्टीनेशन आहे का हे माहित करुन घेणे आवश्यक होते. याबाबत सुपुत्रांशी चर्चा केली असता त्याने होकाराथ उत्तर दिले. त्याच्या वर्गातील एक मित्र हा दुबईचा होता आणि दुबईतील लोकांचे बाकू हे फेव्हरेट डेस्टिनेशन आहे. त्याचा मित्र सहकुटुंब नेहमी बाकू येथे फिरायला जायचा अर्थात दुबईहून. मुलगा गणपती निमित्त घरी आला होता, त्याला म्हटले चल आपण जाऊया सहकुटुंब फिरायला. नेमके त्या कालावधीत कॉलेजला त्याला परीक्षा वगैरे असल्याने येता येणे शक्य नव्हते. त्यामुळे तुम्ही जा म्हातारा-म्हातारी या फिरुन अशी प्रेमळ परवानगीही दिली. खरतर सुपुत्राशिवाय परदेशात फिरायला जायचे जीवावर आले होते. कोरोनामध्ये एक परदेश ट्रिप रद्द झाल्यानंतर पुन्हा एवढ्यात परदेशात फिरायला जायचे नाही असा निश्चय केला होता. अशात ही ऑफर मिळाली होती.

  आतापर्यंत कोरोनाचे वातावरण निवळत आले होते. एवढ्या स्वस्तात आणि एका नामांकित टूर कंपनीमार्फत जर परदेश फेरी होत असेल तर येऊया जाऊन असे ठरवून शेवटी बुकींग केलेच. आम्हाला तेंव्हा जेवढ्या किंमतीत दोघांचे पॅकेज मिळाले होते तेवढ्या किंमतीच्या किमान दुप्पट रक्कम आता या टूरसाठी एका व्यक्तीसाठी मोजावी लागते असे मी बऱ्याच जणांकडून ऐकले आहे. मी गेलो होतो तेंव्हा बाकू टूर फारशी फेव्हरेट नव्हती, मात्र हळूहळू भारतीयांमध्ये परदेश टूरसाठी बाकूची पसंती वाढू लागली. ऑक्टोबर 2023 मध्ये साधारण एक आठवड्याची टूर होती ही. टूर दिल्लीवरून सुरू होणार असल्याने आम्ही गोव्यावरून विमानाने दिल्ली येथे पोहचलो. टूरमध्ये आम्ही दोघेच होतो, आतापर्यंत जे परदेश दौरे केले होते ते ग्रुप टूर होते. यावेळी आम्ही पहिल्यांदाच स्वतंत्र फिरायला जाणार होतो.

  मनात बरीच धाकधूक होती. अझरबैजान मध्ये भाषेचा फार मोठा प्रॉब्लेम होता. आम्हाला जी गाडी दिली होती त्याच्या चालकाला थोडेफार इंग्रजी येत होते. तोच आमचा गाईडही होता. इथे इतर देशात जसे बहुसंख्येने भारतीय भेटतात तसे भेटले नाहीत. सुदैवाने पाकिस्तानी आणि युएईचे नागरिक भेटले. भारतीय पर्यटक भेटले पण त्यांची संख्या तुलनेने कमी होती. बाकू शहरातील आल्हाददायक वातावणाने पहिल्याच दिवशी मन प्रसन्न झाले. अझरबैजान हा देश रशियापासून वेगळा झाला असल्याने तेथील सर्व इमारतीवंर रशियन कल्चरचा प्रभाव जाणवत होता. येथील लोकही गौरवणय त्यामुळे आपण कुठल्यातरी युरोपीयन देशात वावरत असल्याचे भासत होते. या देशाचा बराचसा भाग जरी एशिया मध्ये येत असला तरी काही भाग युरोपमध्ये येतो असे मी काही ठिकाणी वाचले आहे. त्यामुळे बरेच भारतीय टूर कंपनी या देशाचे टूर पॅकेज विकताना युरोप टूर म्हणूनच पॅकेज विकतात, असो.

  या टूरचा तिसरा किंवा चौथा दिवस असेल नक्की आठवत नाही. आज आमची टूर फायर टेम्पल येथे जाणार होती. गाडीत अर्थात आम्ही दोघेच आणि वाहनचालक होता. त्याच्याकडून मोडक्या तोडक्या इंग्रजीत आपण आज एका हिंदू टेम्पलला भेट द्यायला जाणार आहोत हे कळले. इथे मुस्लिम धर्माची लोकसंख्या जास्त होती. इतर धमय नगण्यच होते, निदान मला तरी तसे जाणवले. मात्र सांगण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे कट्टर धार्मिकता मला कुठेच आढळून आली नाही.

  सकाळी साडेदहा अकरा या तेथील लोकल वेळेदरम्यान आम्ही फायर टेम्पलला पोहचलो. एक प्राचिन किल्ल्यासारखी वास्तू होती ती. बरेच हिंदू लोक तिथे फिरायला आले होते. खटकणारी गोष्ट ही होती की भारतीय हिंदू असून पायात बूट आणि चप्पल घालूनच पवित्र वास्तूच्या ठिकाणी सेल्फी घेण्यात मग्न होते. तेथील स्टाफकडून या इमारतीबद्दल माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना काही माहित नव्हते किंवा भाषेची समस्या होती असल्याने त्यांनी मला तेथील माहिती दर्शविणाऱ्या बोर्डाकडे अंगुलीदर्शन केले. त्यातून मला थोडेफार एवढेच कळले की फार पूव भारतीय लोक इथे व्यापारासाठी येत. यामध्ये हिंदू, शीख आणि झोरास्तीयन यांचा समावेश असायचा. जागोजागी याठिकाणी संस्कृत भाषेत अनेक श्लोक भिंतीवर कोरलेले दिसतात.

  फिरता फिरता एका ठिकाणाहून गणेशस्तोत्र कानावर पडले. प्रथम मला वाटले की कुणीतरी मोबाईलवर गणेशस्तोत्र ऐकत असेल पण नंतर एका गुफा वजा खोलीतून आवाज ऐकू येत असल्याचे जाणवले म्हणून त्या खोलीत प्रवेश केला. या खोलीत गणेशाची मुत होती आणि तिथेच ते गणेशस्तोत्र वाजत होते. बाजूलाच फुलांचे साधे डेकोरशन केले होते आणि मुतसमोर फळे होती. फुले आणि फळे ही कृत्रिम असावीत असा माझा अंदाज आहे. मी भराभर या मुतचे फोटो काढू लागलो आणि एक-दोन व्हिडीओही काढले. माझा आणि माझ्या बायकोचा उत्साह पाहून तिथे आलेल्या दोन-तीन माणसाच्या गटाने आम्हाला या मुतबद्दल काहीतरी माहित असेल असे वाटले. त्यांनी आम्हाला तुम्ही गणपतीबद्दल काही जाणता का असे विचारले असता मी उत्साहाने त्यांना सांगू लागलो, मी भारतातील कोकणातील नागरिक असून आमच्याकडे गणपतीची पूजा फार मोठ्या उत्साहाने होते असे सांगितले. आत्ताच आमच्या घरी गणेश चतुथ निमित्त गणेशाची प्रतिष्ठापना झाली आणि आम्ही गणेश चतुथ साजरी केली. गणेशाची कृपा असावी म्हणून आम्हाला ही टूर करायची संधी चालून आली असावी असे त्या परदेशी नागरिकांनी सांगितले. आम्हीही हो म्हटले आणि त्यांना अजून जमेल तेव्हढी गणपती बद्दल आणि कोकणात साजरा होणाऱ्या गणेश उत्सवाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला. तेही आवडीने ऐकत होते हे विशेष.

  पुढे आम्ही पुढच्या ठिकाणासाठी रवाना झालो. मात्र गणपतीची मुत काही डोळ्यासमोरुन जात नव्हती. या ठिकाणाबद्दल जाणून घेण्याचा नंतर बराच प्रयत्न केला. त्यानुसार ही इमारत 17 व्या 18 व्या शतकातील असावी असे कळते. यानंतर बऱ्याच देशात भव्यदिव्य हिंदू मंदिरे आणि देवतांच्या मुर्त्या पाहिल्या मात्र बाकूमध्ये झालेले गणेश दर्शन हे माझ्यासाठी खासच होते. पुन्हा कधी या देशात जाण्याचा योग आला अवश्य दर्शनाला जाण्याची इच्छा आहे.

– संजय गोविंद घोगळे (8655178247)

Leave a Reply

Close Menu