वेंगुर्ला… तळ कोकणातील एक छोटेसे गाव, जिथे इतिहास आणि निसर्ग एकत्र येऊन माणसांना नेहमीच प्रेरणा देतात. या गावात 23 ऑगस्ट 1908 रोजी जन्मलेले एक नररत्न म्हणजे प्रा. विष्णू नारायण आडारकर.
जगप्रसिद्ध असे मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट म्हणजे सर जमशेदजी जीजीभाई यांनी मुंबईत 1857 मध्ये स्थापन केलेले कला महाविद्यालय. जेव्हा झाशीची राणी लक्ष्मीबाई इंग्रजांविरुद्ध युद्ध खेळत होती तेव्हापासून हे कला महाविद्यालय अस्तित्वात आहे. आशियातल्या या कला महाविद्यालयाने जगाला आजपावेतो अनेक मोठे कलाकार दिले आहेत. अशा या कला महाविद्यालयात आपले कला शिक्षण पूर्ण करून 1938 साली याच महाविद्यालयात रुजू झालेले भारतीय मराठी व्यक्तिमत्त्व म्हणजे वेंगुर्ल्याचे सुपुत्र प्राध्यापक वि.ना.आडारकर. 1935 मध्ये उपयोजित कला (अप्लाइड आर्ट) म्हणून सुरू झालेल्या स्वतंत्र कला विभागाचा ताबा 1938 मध्ये प्राध्यापक जेराल्ड यांचे साहाय्यक म्हणून नेमणूक झाल्यानंतर प्राध्यापक आडारकरांकडे आला आणि त्यानंतर उपयोजित महाविद्यालयाचा कायापालट झाला. त्या काळात प्राध्यापक आडारकरांनी आपले राजकीय वजन वापरून (रिझर्व बँकेचे गव्हर्नर भा. ना. आडारकर हे प्राध्यापक आडारकरांचे थोरले बंधू) सरकार दरबाराची सर्व प्रसिद्धीची कामे उपयोजित कलेमार्फत केली, त्यामुळे अल्पावधीतच उपयोजित कला बहरली. 1946 मध्ये मुंबई सरकारने प्राध्यापक आडारकरांना विशेष शिष्यवृत्ती देऊन लंडनला पाठविले आणि लंडन होऊन परत येताच प्राध्यापक आडारकरांची उपयोजित कला महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्राध्यापक वि.ना.आडारकर हे भारतीय औद्योगिक डिझाईन केंद्राचे (आयडीसी) चे संस्थापक सदस्य आणि पहिले सल्लागार होते. 1969 मध्ये आयआयटी मुंबई केंद्राच्या स्थापनेत प्राध्यापक आडारकर यांचा मोलाचा वाटा होता. आकर्षक व्यक्तिमत्त्व लाभलेले सुटाबुटातले प्राध्यापक आडारकर जेव्हा अस्खलित मालवणी बोलत, तेव्हा ते पाहताना कोकणी माणूस धन्य होत असे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून केबिनच्या दरवाजापर्यंत पट्टेवाला शिपाई त्यांना दंडवत घालत असे. लाकडी जिना चढताना प्राध्यापक आडरकरांनी जर जिन्याच्या पट्टीवर बोट फिरवले तर आपली काहीतरी मोठी चूक झाली, हे असे समजून स्वच्छता कर्मचारी दोन दोनदा जिना पुसत असे. असा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा दबदबा त्यांनी निर्माण केला होता. त्या काळात जे. जे. स्कूलच्या आवारात जेवढे शिपाई होते त्यातले 80% शिपाई हे मालवणी होते, याचे कारण म्हणजे त्यांच्या मुलाखतीलाच प्राध्यापक आडारकर त्यांना विचारीत “काय रे तुका मालवणी बोलाक येता मा?“ तो जर मालवणी बोलला तरच त्याला नोकरी मिळत असे आणि गणपतीला गावी जायची सुट्टी ही मंजूर होत असे. असे कोकणावर प्रचंड प्रेम करणाऱ्या प्राध्यापक आडारकरांनी 1958 ते 1961 या काळात महाविद्यालयाचे प्राचार्य पद भूषविले तर 1961 ते 1968 या काळात ते महाविद्यालयाचे डीन म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे डायरेक्टर या सर्वोच्च पदावर नियुक्ती झाली.
असे हे जीवन, जणू कोकणातील समुद्र लाटांसारखे – शांत पण शक्तिशाली. वेंगुर्ल्याच्या मातीने दिलेली ही व्यक्तिमत्त्व, जणू विंदाच्या कवितेसारखी भावुक आणि गहन. “मातीच्या गंधातून उमटतात स्वप्नं, आणि ते स्वप्नं जग बदलतात.“ असे विंदांनी लिहूनच ठेवले आहे. या कवितेत लिहिल्याप्रमाणे प्राध्यापक आडारकरांच्या जीवनातही तेच दिसतं – एक छोटंसं गाव, एक मोठं स्वप्न, आणि त्यातून निर्माण झालेली कला क्रांती. 117 वर्षापूव जन्मलेल्या आडारकरांचे स्मरण आजच्या काळात करणं हे त्यांच्या कला शिक्षणातील क्रांतिकारी योगदानामुळे आवश्यक आहे, कारण सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये उपयोजित कला विभागाचा विकास करून त्यांनी आधुनिक डिझाइन क्षेत्राची पायाभरणी केली, जी आजही आयआयटी मुंबईच्या इंडस्ट्रियल डिझाइन सेंटरमध्ये दिसते. आजच्या डिजिटल आणि इंडस्ट्रियल डिझाइनच्या युगात त्यांची आठवण येते, कारण त्यांनी 1930-1940 च्या दशकातच अप्लाइड आर्टला व्यावसायिक आणि राजकीय महत्त्व त्यांनी दिलं, ज्यामुळे भारतीय कलाकारांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली. कोकणच्या मातीशी विशेषतः वेंगुर्ल्याशी निगडित असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व आजही प्रेरणादायी आहे, कारण मालवणी बोलण्यातून आणि आपल्या माणसांना नोकऱ्या देण्यातून दाखवलेले प्रेम, स्थानिक अभिमान आणि सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवण्याचं महत्त्व शिकवतं. 117 वर्षांनंतरही त्यांचे स्मरण करणं हे कला आणि शिक्षण क्षेत्रातील पिढ्यान् पिढ्या चालणाऱ्या वारशामुळे आहे, जे आजच्या युवा कलाकारांनाही प्रेरणा देते, ज्या काळात विशेष सुविधांची रेलचेल नव्हती, अशा असंख्य अडचणींवर मात करत छोट्या गावातून येऊन जग बदलता येते. अशा वेंगुर्ल्याच्या या सुपुत्राला विनम्र अभिवादन, ज्याने कोकणच्या हृदयातून जगाच्या कॅनव्हासवर रंग भरले.
संकल्पना आणि रेखाचित्रे – प्रा. सुनील नांदोसकर 9869540943
शब्दांकन-प्रशांत आपटे 9422379595
“वैभवशाली वेंगुर्ला“ हे सदर म्हणजे या सदरातून थोर व्यक्तींची ज्यांनी देशात आणि देशाबाहेरही वेंगुर्ल्याची कित पसरवली आणि या गावाला एक नवी ओळख मिळवून दिली. त्याचबरोबर अशा संस्था ज्यांनी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केलं कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता निरपेक्ष सेवा दिली किंवा देत आहेत, अशा वेंगुर्ल्यातील संस्थांची ओळख करून घेणार आहोत. सर्व वाचकांना आवाहन आहे की, तुमच्याकडे वेंगुर्ल्यातल्या अशा माणसांविषयी किंवा संस्थांविषयी माहिती असेल, तर आम्हाला जरूर पाठवा. योग्य माहिती असेल, तर ती या सदरात समाविष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करू.
अधिक माहितीकरिता संपर्क –
9422379595, 9869540943