शब्दसृष्टीचा विलास घडविणारा गणपती

          मानवी मनातील उसळणारे चैतन्य, मनात हिंदकळणाऱ्या मंगल, पवित्र, उदात्त अशा भावना गणपतीच्या रूपाने साकार होतात. त्याच्या आगमनाच्या नुसत्या चाहुलीने मांगल्याची शिंपण होते. भक्तीरसाचा अदृष्यप्रवाह मनामनातून वाहत राहातो. सनातन हिंदू धर्मात उपास्य देवतांमध्ये गणेशाचे स्थान अनन्यसाधारण असेच आहे. कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी श्री गणेशाचे पूजन झाल्याशिवाय कार्याला प्रारंभच होत नाही. संत साहित्याच्या प्रारंभी गणेशाचे स्तवन केलेले आढळते. ज्ञानेश्वरीच्या सुरूवातीला मंगलाचरणाच्या ओव्यांमध्ये गणेशाचे विस्तृत वर्णन केले आहे. गणेश हा भारतीयांचा अत्यंत प्रिय दैवत आहे. तो सकल सुखकारक आहे. विघ्नांचा हर्ता आहे. चौसष्ट कलांचा दाता आहे. कवीने आपल्या वाणीचे पहिले पुष्प याच्याच चरणांवर वाहून आपल्या शब्दसृष्टीचा विकास घडवला. लोकनायक गणेश वंदनेनेच आपले धुंद गानविश्व खुले करतात. इथले लोकनाट्यकार त्याचे रूपडे मुखावर धारण करूनच त्याला खुल्या मंचावर नाट्यारंभी नाचवतात. मानवी मनातील गाभ्याच्या विविध भावभावनांचा, विचार विकारांचा, उम उन्मेषांचा सारा पसारा आपल्या उपासनेच्या संभारात सामावून घेत आलेला आहे. तोच कर्ता, धर्ता आणि हर्ताही आहे. हे परम सत्य त्याच्या उपासकांनी स्वीकारलेले आहे.

  कोकणात गणेशोत्सव म्हटले की एक वेगळाच उत्साह संचारतो. मुंबईकडून कोकणाकडे भरभरून धावणाऱ्या गाड्यांची आणि चाकरमान्यांची संख्या पाहिली की या सणामधील लोकभावनेची खोली लक्षात येते. त्यातील अनिवार्यता जाणवू लागते.

  गणेशचतुथपासून अनंत चतुर्दशीपर्यंत साधारणपणे या सणाची व्याप्ती असते. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, अकरा, एकवीस असे दिवस गणेश मूतचे पूजन करून नंतर विसर्जन केले जाते.

     गणपतीची मूत घरात विराजमान असेपर्यंत घरातील वातावरण अत्यंत पवित्र असते. मद्यपान करणारे मद्यपान करून समोर येत नाहीत. मांसाहार वर्ज्य केला जातो. घरातील संपूर्ण वातावरणच उत्साहपूर्ण व पावित्र्याची, मांगल्याची शिंपण करणारे असते. देवासमोरील नंदादीप माणसांच्या मनातील शांत पवित्र भावनांना आवाहन करत असतो. सुग्रास भोजनाचा वास दरवळत असताना नैवेद्य दाखवीपर्यंत थांबण्यात संयमाचा संस्कार मूकपणे होत असतो. आपापसातील हेवेदावे विसरून लोक एकत्र येतात. थोड्या वेळासाठी का होईना माणसांची मने एका उच्च उदात्त पातळीवर जातात. मनामनात सद्भावनांचे ओंकार निनादत राहातात. या साऱ्या अनुभवातून नेहमीच्या पातळीवर येताना माणसांची मने प्रसन्न व संपन्न झालेली असतात. विघ्नहर्ता गणेश माझी विघ्ने दूर करणार आहे हा विश्वास जीवननिष्ठा मजबूत बनवतो. मनाची मलिनता धुतली जाते. ह्रदयात सुप्त भक्तीचा उमाळा जागृत होतो. भक्तीच्या पवित्र ज्योतीने मनाला व्यापून टाकले जाते. आणि मग हीन, मलीन, नश्वर असे सर्व गळून जाऊन श्रद्धेचीच एक ज्योत मनामनात उजळत राहाते.

    गणपतीच्या दिवसात गावातील वाड्यावाड्यातून भजनाचा स्वर निनादत राहातात. सकाळ संध्याकाळ आर्ततेने आरती केली जाते. घरातील सर्वजण आरतीत सहभागी होत असतात. टाळांच्या, टाळ्यांच्या साथीवर तल्लीन होऊन आरती म्हणताना मनातील भक्तीचा उमाळा उचंबळून येतो. भजनाच्या तालावर देहभान विसरून नाचणारी माणसं हे एक गहिवर आणणारं दृष्य असतं. वैयक्तिक सुख दुःखाच्या भावनांचे अडसर बाजुला ठेवून ते त्या आनंदसागरात स्वतःला झोकून देतात. मनाच्या त्या तादात्मतेतून मनाला प्रसन्नता लाभत असते. म्हणूनच शरीराचा स्नायूंना स्नायू शिणून टाकणारे असे नृत्य करून रात्रीचे जागरण करून ते गणपतीच्या सेवेसाठी परत ताजेतवाने असतात. ‌‘आहेस की नाहीस आता नसे चिंता, दोहीमध्ये आता भेद नुरे‌‘ अशीच मनाची स्थिती होते. आनंद आणि कृतज्ञता यांचे उमाळे येतात.

  तुकडोजी महाराजांच्या शब्दात सांगायचे तर ‌‘सर्व जनांचे समाधान, याहुनी स्वर्ग नाही महान, नांदती द्वेष मत्सरावीण, बंधूभाव जेथ सर्व‌‘ अशाप्रकारे गणेशोत्सवात एकप्रकारे पृथ्वीवर स्वर्गच अवतरतो.

    आजचे मानवी जीवन धकाधकीचे तणावग्रस्त झाले आहे. माणूस आत्मकेंद्री बनत आहे. माणसांपासून माणूस दूर होत आहे. अशा अशांत परिस्थितीत माणसाच्या मनाला भक्तीच्या अमृतमय भावनेतून नवसंजीवनी देणारी, श्रद्धेच्या मजबूत खांबांचा आधार देणारी गणेश चतुथ जवळ आली आहे.

    प्रार्थनेने मनाला बळ येते. गणपतीची श्रद्धायुक्त अंतःकरणाने सेवा आणि प्रार्थना करून लोक आपल्या नित्याच्या व्यवहारात स्वतःला गुंतून घेतील. त्यांच्यासमोर आलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी गणपती त्यांना बळ देईल. गणेश चतुथच्या सणामध्ये केलेल्या भक्तीयुक्त सेवेने मनाला तजेला येतो. त्यातूनच संकटाना सामोरे जाण्याची नव प्रेरणा मिळते. अंधारातही ज्योत बनून जगण्याची प्रेरणा मिळते.

  शब्दसृष्टीचे निर्माते कवी व लेखक याना शब्द शक्तीचा विलास करण्यासाठी गणेश शक्ती देवो. नवनवीन तेजस्वी कलाकृतीतून मानवी जीवनातील सौंदर्याचे, मांगल्याचे, सकारात्मक बाजूचे दर्शन घडविण्याची शक्ती सर्व कलाकारांना लाभू दे. सर्व मानवासाठी कृपादृष्टी लाभू दे अशी प्रार्थना आपण त्या विघ्नहर्त्याच्या पायाशी लीन होऊन करूया.

-सौ. वृंदा कांबळी, 94212 62030

Leave a Reply

Close Menu