एका जुन्या ग्रंथात स्त्रीरूपातील गणेश म्हणजे गणेशानी वा देवी वैनायकीचा फोटो प्रसिद्ध झाला होता. श्रीगणरायांचे हे सुंदर स्त्री रूप होय. रहिमतपूरला स्थान आहे असा त्या ग्रंथात उल्लेख होता. म्हणून मी साताऱ्याजवळच्या रहिमतपूरमध्ये त्या विलक्षण मूतच्या दर्शनासाठी गेलो. समवेत संदर्भासाठी गणेशानीचा फोटो बरोबर ठेवला होता. पण तिथे गेलो असता गावातल्या कुणालाच काही सांगता येईना! सर्वांचे म्हणणे होते की असा गणपती आमच्या पाहाण्यात वा ऐकिवातही नाही.
आमची गाडी कानोसा घेत पुढे चालली होती. एक वृद्ध गृहस्थ नजरेस पडले म्हणून त्यांच्याकडे चौकशी केली. ते चटकन वळले तेव्हा लक्षात आले की ते एक मुस्लिम गृहस्थ होते. मंदिराची चौकशी त्यांच्यापाशी करताच ते क्षणभर थबकले. मला निरखून पाहू लागले व म्हणाले, ‘यह बाजूमे जो गली है वहापे कोई पुराना मंदिर है| अंदर जाके किसीसे पुछो| पता चल जायेगा|’ एवढे बोलून ते निघून गेले. एक बुजुर्ग व्यक्ती बोलली तर पाहू म्हणून गल्लित डोकावताच एक छोटेसे मंदिर दिसले. पण ते समाधीवजा बांधकाम होते. पुढे गेल्यावर काही घरे दिसली. उजव्या बाजूस आणखी एक मंदिर दिसले. पण ते पुरातन वाटत नव्हते. समोर एक घर उघडे दिसले. तिथे डोकावलो. एक गृहस्थ बसलेले दिसले. त्यांना गणेशानी विषयी विचारले. ते म्हणाले, ‘मी प्राध्यापक आहे. माझी हयात रहिमतपूरमध्ये गेली आहे. मी कधीही या गणपतीविषयी ऐकलेले नाही. मात्र पुरातन म्हणाल तर आणखी एक वेगळी बाब मी तुम्हाला सांगू शकेन.’
मी म्हणालो, ‘असे काय वेगळे सांगाल?’
‘ते बघा. शिवमंदिराच्या बाजूला जे घुमटीवजा बांधकाम दिसते आहे ना, त्यात अक्कलकोटस्वामींच्या काळ्या पाषाणातल्या पादुका आहेत. बडोद्याच्या महाराणी जमनाबाई सरकार गायकवाड यांचे पिताश्री विश्वासराव मानेंचे वतन येथलेच. मीदेखील मानेच आहे! हा बाजूचा वाडा पहा, तो विश्वासरावांचाच.’
हे ऐकताच माझ्या डोळ्यात अश्रूच दाटून आले. गंगा आली रे अंगणी म्हणत मी नाचूच लागलो. अत्यंत श्रद्धाभावाने जाऊन श्रींच्या चरणपादुकांचे दर्शन घेतले. प्रतिमा टीपल्या. जणू स्वानंदेशप्रभू मोरयाने व श्रीस्वामीप्रभूंनी आजवर पूर्ण अज्ञात असलेल्या स्थानाकडे अलगद आणून सोडले होते. हे श्रीस्वामी समर्थांचे अद्भूत सामर्थ्य होय. ज्या स्थानाचा आपण कधी विचारही केला नसता, तत्पूव कोणत्याही प्रसिद्ध ग्रंथांत ज्याचा निसटसाही उल्लेख नव्हता, अशा स्थळी ते घेऊन आले होते.
मला तत्क्षणीच समजले की, आता यानंतर श्रीवैनायकी वा श्रीगणेशानी रूपाचाही असाच आश्चर्यकारकरित्या उलगडा होईल. ते उन्हाळ्याचे दिवस होते. रणरणते ऊन मी म्हणत होते. मानेसर मला म्हणाले, अहो सर, तुम्ही गणेश व स्वामींविषयी भरभरून बोलत आहात. पण दरवाजातच उभे आहात. सर, आपले ओठ सुकलेले दिसतात. तुम्ही आत या. दुपारची वेळ आहे. गुळपाणी घ्या. आणि थोड्याच वेळात जेवण करा.
मी हसून म्हणालो, ‘मी गणेशानी शोधार्थ आलो आहे. पहाटेच मुंबईहून निघालो आहे. पण मला भूक नाही. आणि मी एकटा नाही. बरोबर अन्य तिघेजण आहेत.’
एवढ्यात माझे लक्ष गेले ते त्यांच्या आतल्या खोलीत. तिथे एक मुंगूस वावरत होते! मी आश्चर्यचकीत झालो. म्हणालो, ‘अरे हे काय चित्र मी पाहतो आहे.’ मानेसर म्हणाले, ‘अहो, जेवणाची वेळ आहे ना! आमच्याकडे या मुंगुसाचा सारा परिवार जेवायला येतो.’ आणि खरोखरीच काही मुंगुसाना आतल्या बाजूस जेवताना पाहून मी थक्कच झालो. ती मागच्या दाराने घरात येत असत. माने यांनी गूळपाणी तर दिलेच. पण त्यांच्या घरच्या माऊलीने बाहेरचा अंदाज घेऊन स्वयंपाकाचा बेतही सुरू केला. मी माने सरांना गणेशानीविषयी काही आठवते का, असा प्रश्न पुन्हा विचारला. बोलतच पुन्हा बाजूच्या त्या शिव मंदिरात गेलो. बाजूच्या श्रीस्वामीपादुकांचे पुन्हा दर्शन घेतले. मग अवांतर चर्चा सुरू झाल्या. घरात येऊन शांतपणे बसलो. थोड्याच वेळात श्रीस्वामीगणेशकृपेने सर्वांचीच पोटपूजा सुरू झाली. मी जेवत जरी असलो तरी माझ्या नजरेसमोरून गणेशानी जाईना!
मी त्या गणेशानीचा फोटो छापणाऱ्या मूळ लेखकाला मुंबईत फोन लावला. मुंबईत ते नव्हते. मुलगा फोनवर होता. तो म्हणाला, बाबा, कॅनडात आहेत. म्हटलं, संपर्क करा. मी रहिमतपूरमध्ये आहे. मला नेमके स्थानदर्शन घ्यायचे आहे.
मुलाने वडिलांना फोन केला व मला निरोप कळविला. बाबांनाही तो फोटो असाच कुठेतरी मिळाला होता. त्यांनाही नेमके ठिकाण माहीत नाही!
झाले! आता काय करावे! माझ्यासमोर यक्षप्रश्न होता. मी माने सरांना म्हणालो, ‘सर, आपण प्रोफेसर आहात ना! आपल्या कॉलेजमध्ये वा संपर्कात कुणी बॉटनीचे प्रोफेसर आहेत का? कदाचित अशा व्यक्तीकडे त्याच्या जंगलसफारीत भटकंती करताना हा दुर्लक्षित मोरया दृष्टिपथात आलेला असेल तर!’
माने सर म्हणाले, ‘शक्य आहे. कारण हे स्थान कुठेतरी आडवळणी असावे. साताऱ्याजवळ डोंगरदऱ्या फार असल्याने आपण तिथे अंदाज घेऊ शकतो. माझ्या परिचयात साताऱ्यामध्ये एक बॉटनीचे प्रोफेसर आहेत. हवे तर मी येतो तुमच्याबरोबर. कारण एकतर ते वयोवृद्ध आहेत व नवीन माणसांसमोर चटकन बोलतील असेही नाही.’
अशाप्रकारे आम्ही साताऱ्याला गेलो. पुढील तपशीलात फार जात नाही. पण योगायोग असा होता की ज्या प्रोफेसरना आम्ही भेटलो, त्यांनीच या मोरयाचा पूव शोध लावून प्रसिद्धीही केली होती. यांच्याच माहितीच्या आधारे ती वैनायकी-गणेशानी आधीच्या लेखकाने सर्वांसमोर आणली होती. त्या सरांनी आनंदाने आपल्याजवळील महत्त्वपूर्ण साहित्य मला दिले. तसेच, रहिमतपूरजवळच्या देगावजवळच्या पाठेश्वराच्या डोंगरातले हे स्थान व तेथील अन्य दुर्लक्षित पण आक्रमकांपासून सुरक्षित राहिलेल्या हजारो शिवलिंगांच्या लेण्यांची माहिती दिली!
पुढच्या दोनच तासात आम्ही देगाव गाठले. गाड्या गावात ठेऊन दिड दोन किलोमीटरच्या पायपिटीनंतर डोंगरमाथा गाठला. तेव्हा एकदा त्या परमपावन श्रीगणेशानी देवतेने आपल्या या लेकरांना प्रसन्नतेने दर्शन दिले.
भगवंताची लीला किती अद्भूत असते पहा ना! चित्तथरारकही आहे. भक्तांसाठी ते कसे करुणामय आहेत पहा ना!
महाराष्ट्र भ्रमंतीत वेळोवेळी मंगलमूत गजानन व मंगलमूत श्रीस्वामीप्रभूंनी आम्हा पामर भक्तांची प्रत्येक वेळी मोठी बडदास्त राखली आहे. या प्रसंगांवर लिहावे तेवढे थोडेच आहे!
श्रीगणेशानीच्या मूत बहुदा नवव्या दहाव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत राष्ट्रकुट राजांच्या कार्यकाळात स्थापन झाल्याचे पाहावयास मिळते. यांचे आणखी एक दुमळ सुंदर ध्यान अंबेजोगाईच्या योगेश्वरी माता मंदिराच्या शिखरावर स्थापित दिसते. तेथील ती मूत सवस्त्रा आहे, तर पाठेश्वरची वैनायकी सुडौल व मोजक्या वस्त्रात विद्यमान आहे. जिथे जिथे सप्तमातृकांचे पट्ट दिसतात, त्या मूतत अनेकदा या वैनायकी शक्तीचे दर्शन घडते. अशी मूत सासवड जेजुरीच्या पुढे भुलेश्वराच्या अत्युच्च डोंगरात असलेल्या पुरातन मंदिरातही असल्याचे सांगितले जाते.
पंचवीस वर्षांपूव अशाच एका विलक्षण प्रसंगातून येवल्याजवळील सावरगाव येथे एका मारूती मंदिराच्या मागे तळपायात एक शेंदूर लागलेला दगड आढळून आला होता. ही बाब मला समजल्यावर आग्रह धरून तो पाषाण मी खोदवून काढून घेतला. तेव्हा ते एका पाषाणात नृत्याविष्कारातले उभे पाच गणपती कोरलेले आढळले. त्यात एक मूत गणेशानीप्रमाणे आहे!
ही मूत मूळ वेंगुर्ल्याचे असलेले श्रीस्वामीशिष्य श्री आनंदनाथगुरुंनी स्थापन केलेल्या श्रीस्वामी समर्थ मठालगतच सापडल्याने, आनंदनाथांचे नातू गुरुनाथबुवा वालावलकर यांच्या साक्षीने या श्रीस्वामी समर्थ मठाच्या दर्शनी भागात या पाषाण खंडाची स्थापना करविली, जी आजही नित्य पूजनात आहे.
श्रीगणरायांच्या या स्त्री रूपाबद्दल जनमानसात फार वाच्यता नाही. यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या निमित्ते हा एक वेगळाच विषय येथे आवर्जून चर्चिला आहे, जो गणेशोपासकांसाठी एक आगळावेगळा संदर्भ ठरावा.
– संजय नारायण वेंगुर्लेकर 9869111850