कोकणी माणसाला साहित्यातून जगासमोर आणले

जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आनंदयात्री वाङ्मय मंडळाने वर्षभर राबविलेल्या विविध कार्यक्रमांचा सांगता सोहळा वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकांनद कौशल्य विकास सभागृहात संपन्न झाला. यावेळी आनंदयात्रीच्या अध्यक्षा वृंदा कांबळी, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, निवृत्त  गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर, कीर्तनकार हृदयनाथ गावडे, व्यगचित्रकार संजय घोगळे, साहित्यिक डॉ.सुधाकर ठाकूर, पटकथाकार प्रसाद खानोलकर आदी उपस्थित होते. जयवंत दळवींनी कोकणी माणसाला आपल्या साहित्यातून जगासमोर आणले. त्यांच्यातील ‘ठणठणपाळाने‘ क्रांतीची ज्योत पेटविली होती. असे थोर साहित्यरत्न आपल्या वेंगुर्ला तालुक्याचे सुपुत्र आहेत, याचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटत राहील असे प्रतिपादन वृंदा कांबळी यांनी केले. आनंदयात्री वाङ्मय मंडळासारख्या विविध संस्थांनी वेंगुर्ल्याची गरिमा वाढविली आहे. जयवंत दळवींच्या साहित्याचा जागर वर्षभर करून आनंदयात्रीने या भूमीचे ऋण फेडले आहेत असे दिलीप गिरप म्हणाले. रमेश पिगुळकर, हृदयनाथ गावडे, संजय घोगळे, डॉ.सुधाकर ठाकूर, प्रसाद खानोलकर यांनीही दळवी यांच्याबद्दलचे विचार मांडले.

जयवंत दळवी यांचा साहित्य जागर‘ यावर प्रा.पांडुरंग कौलापुरे, चारूता दळवी, कीर्तनकार अवधूत नाईक, कथाकार प्रदिप केळुसकर, प्रितम ओगले यांनी समग्र जयवंत दळवींचे दर्शन घडविले. नाट्य सादरीकरण या सत्रात गौरव राऊळ, प्राजक्ता आपटे व सावंतवाडीचे योगीश कुलकर्णी यांनी जयवंत दळवींच्या साहित्यातील पात्रे जिवंत केली. सूत्रसंचालन महेंद्र मातोंडकर यांनी केले. तर आभार प्रा.सचिन परूळकर यांनी मानले.   

Leave a Reply

Close Menu