दळवींचे साहित्य हीच त्यांची संजीवन समाधी – प्राचार्य सामंत

     आरवली या जयवंत दळवींच्या जन्मगावी आजगांव येथील साहित्य प्रेरणा कट्टाच्या ९८व्या मासिक कार्यक्रमांतर्गत शिरोडा येथील र.ग.खटखटे ग्रंथालय व दळवी कुटुंबियांच्या सहयोगाने जयवंत दळवी जन्मशताब्दी सांगता सोहळा संपन्न झाला. यावेळी कै.जयवंत दळवी यांचे सुपुत्र गिरीष दळवी, ‘संगीत देवबाभळी‘ या नाटकाचे लेखक तथा दिग्दर्शक प्राजक्त देशमुख व गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष तथा नामवंत प्रवक्ते प्राचार्य अनिल सामंत आदी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

    चिरंजीव असलेले जयवंत दळवींचे साहित्य कधीही कालबाह्य होणारे नसल्याने त्यांचे साहित्य हीच त्यांची खरी संजीवन समाधी असल्याचे प्रतिपादन प्राचार्य अनिल सामंत यांनी केले. गोव्यातील चित्रकार लक्ष्मण चारी यांनी रेखाटलेल्या जयवंत दळवी यांच्या पेन्सिल रेखाचित्रास पुष्पांजली अर्पण करून गायक शेखर पणशीकर यांनी गायलेल्या ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश..‘ या गीताने सोहळ्याला सुरूवात झाली. दळवींच्या साहित्यात आलेल्या त्यांच्या घरातील वस्तू, आरवली परिसरातील वास्तू तसेच व्यक्ती यांचा मागोवा घेणारा राजेश नाईक निर्मित ‘पाऊलखुणा‘ हा कार्यक्रम दृकश्राव्य पद्धतीने सादर करण्यात आला. विनय सौदागार दिग्दर्शित ‘दळवींचे साहित्य चरित्र‘ या दळवींच्या साहित्याचे अभिवाचन व अभिनयाच्या माध्यमातून वेध घेणा­या कार्यक्रमात उमा प्रभू-देसाई (गोवा), निला इनामदार (अमेरिका) व स्थानिक कलाकार रविद्र पणशीकर यांनी दळवींच्या विविध  नाटकातील व्यक्तिरेखा सादर केल्या. सरोज रेडकर, सोमा गावडे, स्नेहा नारिगणेकर, वैभवी राय-शिरोडकर, डॉ.गणेश मर्ढेकर, आसावरी भिडे, काशिनाथ मेस्त्री या स्थानिक वाचकांनी दळवींच्या विविध पुस्तकांमधील निवडक भागांचे अभिवाचन केले.

   ‘आप्तेष्टांशी हितगुज‘ या कार्यक्रमात दळवींचे सुपूत्र गिरीश दळवी व स्नुषा आदिती यांच्या सोनाली परब यांनी घेतलेल्या मुलाखतीमधून दळवी हे वडील व सासरे म्हणून किती विशाल मनाचे होते, याची प्रचिती उपस्थितांना आली. ‘सन्मित्र जयवंताचे‘ या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते भाई मंत्री व पत्रकार अनिल निखार्गे यांच्याशी प्रा.गजानन मांद्रेकर यांनी केलेल्या गप्पांमधून दळवींचे सामाजिक कार्य तसेच आरवलीविषयी त्यांना वाटणारा जिव्हाळा यासंदर्भात दळवींच्या चाहत्यांना व त्यांच्या वाचकांना ज्ञात नसलेली माहिती मिळाली. दळवी यांच्या सुकन्या शुभांगी नेरूरकर तसेच माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, सुप्रसिद्ध नाटककार सतिश आळेकर, नामवंत साहित्यिक मुकुंद टाकसाळे यांची मनोगते दृकश्राव्य फितीद्वारे दाखविण्यात आली. प्राजक्त देखमुख यांनी दळवी यांच्या ‘आत्मचरित्राऐवजी‘ या पुस्तकामधील ‘जगी हा खास वेड्यांचा पसारा‘ या लेखाचे अभिवाचन केले. सोहळ्याचे सूत्रसंचालन गोव्यातील साहित्यिक सोनाली परब यांनी केले. तर खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Close Menu