श्री. उमेश वाळवेकर आपल्या 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून 31 जुलै 2025 रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त सेवापूत सत्कार समारंभ कार्यक्रम साई डिलक्स कार्यालय, वेंगुर्ला येथे अध्यक्ष विरेंद्र कामत आडारकर व प्रमुख पाहुणे प्रशांत प्रभाकर धोंड (माजी प्राचार्य वा. स. विद्यालय माणगाव) तसेच औदुंबर शिवदास भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत 10 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भिसे मॅडम यांनी प्रास्तविकातून सरांच्या कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विरेंद्र कामत आडारकर यांनी “वाळवेकर सर हे आपल्या सेवा काळात विद्वत्ता व अध्यापन कौशल्याच्या जोरावर विद्याथ प्रिय शिक्षक आहेत. अध्यापनाबरोबरच त्यांची क्रिकेटविषयी असणारी आवड विशेष उल्लेखनीय आहे. नियोजन कौशल्य व काम करून घेण्याची हातोटी विशेष आहे.“ असे गौरवोद्गार काढले. व त्यांच्या हस्ते सत्कारमुत उमेश वाळवेकर यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्था कार्यकारिणी सदस्य, आजी माजी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक-शिक्षक संघ, शाळाव्यवस्थापन समिती, सर्व पालक व विद्याथ वर्ग, यांच्यामार्फत भेटवस्तू स्वरूपात सुवर्ण अलंकार (अंगठी) तसेच मान्यवरांच्या हस्ते सरांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी माजी विद्याथ अजित केरकर, समीर घोंगे तसेच माजी विद्याथ यांच्यामार्फत सरांचा सत्कार करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्या वतीने वाळवेकर सर यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देण्यात आला. यावेळी वेंगुर्ला तालुका शिक्षक भारती संघटनेचे तालुकाध्यक्ष जयेश राऊळ व अन्य सहकारी उपस्थित होते. यावेळी जयप्रकाश चमणकर, समीर घेोंगे, उल्का वाळवेकर, रमेश पिंगुळकर, राहुल वेंगुर्लेकर, किनळेकर सर, सुजित चमणकर, राहुल वाळवेकर, सावळाराम कांबळी सर, अमृता नवार, श्री. कोळी आदींनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली.
उमेश वाळवेकर सर सत्कारास उत्तर देताना म्हणाले की, “वडिलांचा ज्ञानदानाचा वसा घेऊन शाळेच्या सुरूवातीच्या संघर्षाच्या काळात वेगवेगळे अनुभव आले. परंतु या संघर्षात संस्था अध्यक्ष व सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य यांचे आशीर्वाद व सहकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे शाळेला सर्व क्षेत्रात यश संपादन करून देण्यात यशस्वी झालो याचे समाधान आहे. या माझ्या कार्यात आजी माजी संस्था कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे तसेच सर्व सहकारी शिक्षक व कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले. माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत या शाळा संस्थेचा मोलाचा वाटा आहे. हे मी कधीच विसरणार नाही.”
या कार्यक्रमास राधाकृष्ण मांजरेकर, निलेश मांजरेकर, सुजित चमणकर, भाऊ करंगुटकर, श्री. श्रीकृष्ण पेडणेकर, शिवराम आरोलकर, गुरूदास कुसगावकर, पी.डी.कांबळे, एस.एस. काळे, का.हु.शेख सर, माजी शिक्षक-शिक्षिका, मित्रपरिवार अन्य शाळांमधील शिक्षक-शिक्षिका, सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष व सहकारी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास संभाजी लोहार (कोल्हापूर) सौ. वर्षा मोहिते (बेंगलोर), शिवाली वाळवेकर (अमेरिका) व स्वप्नील चमणकर (अमेरिका) यांनी संदेशाव्दारे शुभेच्छा दिल्यानंतर वाळवेकर सर यांच्या कुटुंबीयांनी सर्व संस्था पदाधिकारी व शिक्षक तसेच सर्व कर्मचारी यांना भेटवस्तू तसेच संस्थेस रोख रू. 25000/- देणगी स्वरूपात दिले. शेवटी संस्था सचिव रमेश नरसुले यांनी सर्व उपस्थितांचे आभार तर अध्यापक वैभव खानोलकर सर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.