म्हापण (ता.वेंगुर्ले) या कोकणातील छोट्याशा गावातून शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करणारे डॉ. नरसिंह लक्ष्मीनारायण ठाकूर सागरी विज्ञान व जैवतंत्रज्ञान या क्षेत्रातील एक मान्यवर शास्त्रज्ञ म्हणून परिचित आहेत. अलीकडेच त्यांना गोवा येथील सीएसआयआर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानमध्ये मुख्य वैज्ञानिक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. डॉ. ठाकूर यांनी बीएस्सी. प्राणीशास्त्र पदवी संपादन केली असून पुढे एमएस्सी. सागरी जीवशास्त्र या विषयात उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी गोवा विद्यापीठातून सागरी विज्ञानात पीएचडी (2002) प्राप्त केली. त्यांच्या डॉक्टरेट संशोधनाचा विषय निवडक सागरी जीवसृष्टीतील जैवक्रियाशिलतेचा अभ्यास हा होता. पदव्युत्तर व डॉक्टरेट शिक्षणानंतर त्यांनी जर्मनीतील Johannes Gutenberg University Mainz येथे संशोधक शास्त्रज्ञ म्हणून काम केले. मुंबईतील Nicholas Piramal Research Centre येथे सागरी जैवतंत्रज्ञान गटप्रमुख म्हणून कार्य केले. 2007 पासून ते CSIR-NIO मध्ये कार्यरत असून आज ते संस्थेतील केमिकल ओशनोग्राफी विभागप्रमुख, ACSIR स्कूल ऑफ ओशनोग्राफीचे प्राध्यापक व समन्वयक तसेच आंतरराष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान व्यवहार गटप्रमुख आहेत.
संशोधन क्षेत्रात त्यांनी सागरी जीवसृष्टीतून औषधे, प्रतिजैविके व औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त उत्पादने शोधण्याचे काम केले आहे. पन्नासहून अधिक संशोधन लेख प्रकाशित केले असून दोन पेटंट्स नोंदविली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. सहा विद्याथ सध्या त्यांच्याकडे संशोधन करत आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पांचे नेतृत्व करताना त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. त्यांचे युरोपीय देशांसह ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांशी संशोधन सहकार्य आहे. सागरी जैवतंत्रज्ञान या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकाशनांचे आणि जगभरातील विविध विद्यापीठांच्या प्रबंधांचे (थिसीस) परीक्षणकर्ते म्हणूनही ते कार्य करतात. डॉ. ठाकूर यांची खरी ओळख केवळ संशोधक म्हणूनच नाही, तर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे मार्गदर्शक म्हणूनही आहे. महाराष्ट्राला तब्बल 720 किमीचा सागरी किनारा लाभला असूनही या प्रदेशातील विद्यार्थ्यांचा सागरी विज्ञानाकडे कल कमी आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी डॉ.ठाकूर विविध शाळा व महाविद्यालयांना भेट देऊन व्याख्याने देतात आणि विद्यार्थ्यांना या रोचक व भविष्यातील संधींनी भरलेल्या क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रोत्साहित करतात.
अलीकडेच त्यांना फ्रान्समधील युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ब्रिटनी येथे झालेल्या तेराव्या आंतरराष्ट्रीय मरीन बायोटेक्नॉलॉजी परिषदेत (IMBC 2025) सहभागी होऊन सागरी जीवशास्त्र व जैवतंत्रज्ञानावरील एका वैज्ञानिक अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषविण्याचा मान मिळाला. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांची उपस्थिती ही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
म्हापण येथील डॉ. नरसिंह ठाकूर यांची गोवा येथील सीएसआयआर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान (CSIR-NIO) मध्ये मुख्य वैज्ञानिक (Chief Scientist) म्हणून झालेली पदोन्नती ही संपूर्ण कोकणवासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. डॉ. एन. एल. ठाकूर हे म्हापण येथील शासकीय कंत्राटदार श्रीकृष्ण (एस. एल.) ठाकूर यांचे बंधू आहेत.