वाढत्या सोशल मिडियाच्या युगात एककिडे वाचन संस्कृती कमी होत असतानाच पुस्तक प्रदर्शनासारखे उपक्रम वाचन संस्कृती जीवंत ठेवण्याचे कार्य करीत आहे. वाचनातून वाचकाला ज्ञानज्योत मिळते. वाचन माणसाला समृद्ध करते. पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून विविधांगी पुस्तकांच्या खजिन्यांची चावी दिली आहे, वाचकांनी याचा फायदा करून घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तथा आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या वेंगुर्ला अध्यक्षा वृंदा कांबळी यांनी पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
वाचनवाट ग्रंथदालनातर्फे वेंगुर्ला नगरवाचनालय येथे भव्य पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका विशाखा वेंगुर्लेकर, साहित्यप्रेमी माधवी मातोंडकर, नगर वाचनालय संस्थेच्या पूजा धावडे, जेनी डिसोजा, पत्रकार महेंद्र मातोंडकर, प्रथमेश गुरव, वाचनवाट ग्रंथदालनाचे मुग्धा मणेरीकर आणि सचिन मणेरीकर आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन 14 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनात मराठी दर्जेदार पुस्तके, लहान मुलांसाठी आकर्षक सचित्र पुस्तके, व्यवसायमाला, भाषिक खेळ, शब्दकोडी मांडण्यात आली आहेत. आवडीची पुस्तके खरेदी करण्यासाठी शाळा महाविद्यालय तसेच वाचनालय यांना सवलत योजनाही ठेवण्यात आली आहे. तरी वाचकांनी या ग्रंथ प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन मुग्धा मणेरीकर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत मुग्धा मणेरीकर यांनी तर आभार सचिन मणेरीकर यांनी मानले.
