वेंगुर्ला पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे येथील रा.कृ. पाटकर हायस्कूलमध्ये आजपासून 53व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला प्रारंभ झाला असून या विज्ञान प्रदर्शनात सुमारे 61 प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन तालुका गटविकास अधिकारी तथा प्रशासक वासुदेव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी पाटकर, वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचे संचालक डॉ.वैभव शिंदे, केंद्रप्रमुख महादेव आव्हाड, तुळसकर, अडुळकर, शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र कोनकर, वेंगुर्ला विज्ञान मंडळ अध्यक्ष चव्हाण, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, उपस्थित होते. या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात 43 तर माध्यमिक गटात 18 प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. तसेच माध्यमिक व प्राथमिक गटातून शिक्षक प्रतिकृतीही मांडल्या आहेत. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी गोसावी, स्वागत मुख्याध्यापक सुशांत धुरी यांनी केले. सूत्रसंचालन मनिषा खरात यांनी तर आभार विलास गोसावी यांनी मानले.
