
परंतु पावसातली अशी एखादी गोष्ट लेखनाला प्रेरणा देईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं..परंतु पावसाळाच तो.. वढल्या झाडालाही धुमारे आणण्याची त्याची ताकद..मला तरी शब्दधुमार्यांपासून बाजूला कसं ठेवेल बरं ?
चार दिवसांपूर्वीचीच गोष्ट.. त्या दिवशी तुफान पाउस पडत होता..बाहेर पडणारे पावसाचे टपोरे थेंब, कातळावरचा भणाण वारा..वातावरण अगदी गार..संध्याकाळची चहाची वेळ होती.आले घालून फक्कड चहा केला आणि गरमागरम वाफाळता चहाचा कप ओठाला लावला.एक घोट घेतला आणि रीळला काय स्थीती आहे पाहू या हेतुने चौकशी साठी आईला फोन केला..रीळ हे डोंगर कुशीत वसलेलं खर्रखुर्र खेडेगाव.गर्द झाडी..आजही तीथे मोबाईल टाॅवर नाही त्यामुळे लॅण्डलाईनखेरीज पर्याय नाही.फोन न लागणं हे पावसाच्या दिवसात नवीन नाही.त्यामुळे न कंटाळता सरावाने दोन तीन वेळा नंबर डायल केला..आणि अखेर रींग गेली…हॅलो…आई ना, म्हणे पर्यंत पलीकडून एक वेगळाच संवाद कानावर आला..
छे..आम्हाला कसला कंटाळा..लाॅकडाउन आम्हाला काही नवीन नाही गं.
म्हणजे? अगं अगदी खेडेगावात रहाणारी माणसं आम्ही..वर्षाचे तसे तीनशे पासष्ठ दिवस लाॅकडाऊनच कि..अलिककडे बारा तेरा वर्ष तर कुठेच जाणं नाही.हे असे अर्धांगाने जाग्यावर पडले आणि मग सारंच लाॅकडाउन. ..कधी लाईट नसतात,फोन बंद पडतात,कंदील,डबरी संगळं असतं साथीला.ठेवावचं लागतं..मण्यार,फुरशी निघतात.
बाप रे काकू…काही काय..किती सहज सांगताय तुम्ही..
अगं, खरं तेच सांगते आहे.मल्हारला विचार हवं तर..परवा गोठ्यात घोणस मारला फोटो पाठवले होते त्याला..
ओह माय गाॅड..किती सहज आणि शांतपणे सांगताय सगळं?
अगं..जितक्या सहजतेने आम्ही इथे वावरतो,जगतो तितक्याच सहजतेने सांगते आहे. ही जनावरं, सरपटणारे जीव यांचेच राज्य सगळं..त्यात आपण जागा केली. कधीतरी भेटीला येतात बापडे..दिवसा दिसले तर बाहेर सोडून देते.अगदीच घरात, गोठ्यात आलं तर इलाज नही.जवळपास फार घर नाहीत..रात्रीवीता आली तर मारावी लागतात.
गुरं वगैरे आहेत ना..सांभाळावं लागतं गं..मुका जीव तो..
बाप रे..कसं जमतं हे..
काही अवघड नाही बघ..निसर्गाशी जवळीक साधली कि होतं सगळं आपोआप.
काकू अजूनही या वयात गुरं वगैरे व्याप सांभाळलेत.
हो अगं..करायलाच हवं..आता फार नाही,पण दोन म्हशी आहेत.दूध दुभतं लागतं,घरातही होतं आणि गावात विकते थोडं..दूध,तूप..
दुकानं लांब लांब..रोज दूध आणायला कोण जाणार?त्यापेक्षा ही मेहनत बरी ना.बाकी जिन्नस आणता येतो सहा महीन्यांनी. भाजी लावलेय परसात..दोघांपूर्ती रग्गड मिळते..आजूबाजूंच्याचीही सोय..पैसेही मिळतात.
हो..पण शाबास तुमची..
कसला आवाज झाला हो?अगं पत्र्यावर नारळ पडला..बरं तु कशी आहेस.काम कसं चाललय.परवा आमच्या गार्गीचा फोन आला होता..हो का..कशी आहे ती?
आहे बरी..लाॅकडाउनला कंटाळलेय म्हणाली.बोअर झालय..कामाचा ताण,आउटींगला जाता येत नाही.बाहेरचे काही मागवता येत नाही.कामवाल्या नाहीत..
हो ना..माझी ही तीच अवस्था झाली आहे.नको वाटतय सगळं.पण काय करणार..झालं..तेवढ्यात फोन मधुन खर्रर्र खुर्ररर असे काही आवाज झाले आणि फोन बंद झाला.
एरव्ही क्राॅस कनेक्शन झाल्यावर झट्टकन् फोन कट करणारी मी काहीतरी वेगळं जाणवल्याने,पलिकडच्या आवाजाच्या मार्दवतेमुळे कानाला फोन लावूनच पाच सात मिनिटं हे संभाषण शांतपणे ऐकत होते.त्या काकूंच्या बोलण्यात एक वेगळंच सामर्थ्य होतं. संकटाचा सामना करुन आलेलं ,परिस्थीती ने आलेलं कणखरतेचं सामर्थ्य, स्वाभिमान होता, न कुरकूरता कष्टांची आणि हसतमुखाने स्वागताची तयारी होती हे नुसत्या शब्दांतून जाणवत होते.
हा संवाद विचार करायला लावणारा होता.
खरंतर कोरोनाचे आलेलं संकट फार वेगळं आहे,सर्वांनाच काहीना काही शारीरिक, मानसिक, आर्थिक किंमत मोजायला लावणारं आहे परंतु या कोरोनाने एक वेगळा
शहाणपणाचा पाठ शिकवायचं ही ठरवलय..थांबा. विचार करा,बदलती जीवनशैली, बदलत्या संकल्पना, थ्रील, विचार, वर्तन, भावभावना सगळ्या गोष्टींचा बारकाईने पहाण्याचा जणू डोसच दिलाय.
आपण मान्य केलं अथवा नाही केलं तरी ह खरं आहे कि,मधल्या काही वर्षांच्या कालखंडात बहुंताश लोकांच्या दृष्टीने पैसा हे साधन न रहाता साध्य बनलं.लोक शहरांकडे धाव घेऊ लागले,गावात कसल्याच फॅसिलीटी नाहीत हे कारण देत इथे करण्यासरखं बरंच काही असताना देखील गावावर मनातून फुली मारली जाऊ लागली.
शिक्षण, नोकरी, उत्तम पगार याचं स्वप्न पहाणं ते सत्यात उतरावं म्हणून प्रयत्न करणं यात वावगं काहीच नाही परंतु इच्छा हव्यासात बदलू लागल्या कि गोंधळ सुरु होतो.अलिकडच्या काळात भौतिक सुख सुविधांच्या आकर्षणाच्या भोवर्यात माणूस असा काही फिरत होता कि वेगवेगळ्या तर्हेने वाहायला लागला.एखाद्या गोष्टीची चटक लागावी तशी सुखाची चटक लागली.सुखाच्या वेगवेगळ्या संकल्पना आकार घेऊ लागल्या.मौज,मजा,भटकंती,सतत हाॅटेलींग,बारीक सारीक गोष्टींचं सेलिब्रेशन हे इतकं वाढलं कि विचारु नका.गरजा वाढल्या..पैसा मिळवणं ओघाने आलंच..ऊर फुटेस्तो धावणंही आलंच..,सुखाच्या ट्रेडमीलवर सगळे धावतायत..ट्रेडमीलच ती..अंतर सेट केलं नाही आणी थांबायचं स्वतःहून ठरवलं नाही तर थांबणार कसं..हे संपलं ते…ते संपलं हे..,कर कर कर बौध्दीक काम करायचं..पळ पळ पळायच आणि शांतता(??)शांतता मिळवायाला दोन दिवस आऊटींगला जायचं..या सगळ्या “चेंजलाच” कोरोनाने चेंज करुन टाकलं.
बर्याच श्रमजीवी माणसांचे फार हाल झाले,चालले ही आहेत. तरीही भौतिक सुख सुविधांनी युक्त जीवन जगणार्या सर्वांना एकमेकांना खर्या अर्थी वेळ देणं,थांबणं,सहकार्यातून वाटचाल करणं,स्वतःमध्ये डोकावून पहाणं याचा पाठ पढवत आभासी जगात रमणं हेच जीवन नव्हे त्या पलिकडेही काही आहे याची कोरोनाने”सध्या तरी जाणीव” करुन दिली आहे.ईगो नावाच्या विषाणूला बाजूला सारत नात्याचा ,आपुलकीचा बंध घट्ट केला आणि एकमेकांसाठी आपण आहोत. असा पक्का विश्वासाचा सॅनिटायझर तयार झाला तर अशा संकटाचही सामना करणं सुसह्य होईल हे ही शिकवलं.
त्या फोनवरील संवादात काकूंनी किती गोष्टी सहजतेने सांगितल्या..निसर्गाशी तादात्म्य पावणं,त्यांनी साधलेली,जपलेली आत्मनिर्भरता,जे समोर आहे ते स्विकारत पुढे चालणं आणि कसलाही दिखावा न करता चालतच रहाणं.
खरंच सोप आहे हे?किती वर्ष वेगवेगळ्या दुर्गम भागातील माणसे अशी निसर्गाशी तादाम्य पावत न कुरकुरता सहजतेने वाटचाल करत असतील नाही?आम्हाला तीन महिन्यांच्या लाॅकडाऊनने हैराण केलय परंतु अर्धांगाने दहा पंधरा वर्ष अंथरुणाला खिळलेल्या काकांचे आणि पर्यायाने काकुंचेही लॅाकडऊन, अपघातात अवयव गमावून बसलेल्या काहीं व्यक्तींचे जन्मभराचे लाॅकडाऊन,कुणीच विचारत नाही ही जखम काळजात घट्ट बंद करुन जगणार्या वृध्दांचे लाॅकडाउन.वर्षानुवर्ष फक्त सोसणं, भावनांचा कोंडमारा करत व्यक्त ही न होता आलेल्या अनेक स्त्रीयांचं लाॅकडाऊन अशी किती किती जणांची लाॅकडाऊन वर्षानुवर्षे सुरु असतील नाही?त्यापुढे आताचे हे लाॅडाऊन,नियम पाळणं काहिच नाही. नाही का?
वर्षानुवर्षे अशी लाॅकडाऊन अनुभवलेल्या माणसांनी प्रतिकूलता स्विकारत न हरता,न रडता आपली वाटचाल कशी सुरु ठेवली असेल?स्विकाराचा परिघ केवढा विस्तारावा लागला असेल त्यांना?त्यांच्यापुढे
छे.. बोअर झालय अगदी अशी तक्रार करणारे आपण सर्वार्थानं किती खुजे वाटतो नाही?अशा अनेक विचारांच्या,प्रश्नांच्या सरींची बरसात तो एक फोन करुन गेला.
बाहेरचा तुफान पाऊस आणि वार्याच्या आवाजाने मी पुन्हा भानावर आले आणि वाफाळत्या चहा सोबत मिळालेलेल्या या विचारधनातून सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सज्ज झाले..
-अॅड.सुमेधा देसाई..तळेबाजार देवगड.
मोबा नं-9422611583