गणेश चतुर्थीसाठी शहरातील वाहतूकीचे व बाजारपेठेचे नियोजन केले असून दि.७ ते २१ सप्टेंबरपर्यंत रामेश्वर मंदिर येथे एसटी थांबा, दि.८ ते १४ सप्टेंबर कालावधीत मारुती स्टॉप ते बाजारपेठ रस्त्यावर फक्त टुव्हिलर व रिक्षांनाच प्रवेश, इतर वाहने राममारुती मार्गे जातील. व्यापा-यांनी रात्रौ ९ ते पहाटे ५ पर्यंत माल उतरावा, नेवाळकर स्टॉप रिक्षा स्टॅण्ड परुळेकर गल्ली येथे न्यावा, माटवीचे साहित्य विक्री करणा-या किरकोळ व्यापा-यांनी रस्त्याच्या दुतर्फा बसावे तर गणेश चतुर्थी कालावधीत मोकाट फिरणा-या जनावरांच्या मालकांवर ५०० रु.दंड आकारण्यात यावा असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
गणेश चतुर्थी नियोजनाची बैठक ३१ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला न.प. प्रशासकीय इमारतीमधील स्वामी विवेकानंद हॉल येथे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळ तहसिलदार प्रविण लोकरे, पोलिस निरिक्षक तानाजी मोरे, नगरसेवक, वीज वितरणचे प्रतिनिधी, एसटी कर्मचारी, व्यापारी प्रतिनिधी, रिक्षा संघटना प्रतिनिधी, किरकोळ व्यापारी व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत गणेश कॉम्प्लेक्स, माणिकचौक, शाळा नं.१, सिद्धिविनायक प्लाझा, कन्याशाळा, नगरवाचनालय, बाळासाहेब पाटील यांच्या नियोजित इमारती नजिक फोर व्हिलर पार्किग, वेंगुर्लेकरवाडी व रामेश्वर मंदिर येथे थ्री व्हिलर पार्किग, कुबलवाडा व सप्तसागर ते मारुती मंदिर येथे मालवाहक तीन चाकी तर सागररत्न मत्स्यबाजारपेठेचा तळमजला, वेंगुर्लेकरवाडी, सप्तसागर व रामेश्वर मंदिर येथे टु व्हिलर पार्किगचे नियोजन करण्यात आले. या प्रत्येक ठिकाणी पार्किग बोर्ड व पोलिस कर्मचारी ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.
सार्वजनिक बांधकाम खात्याने व नगरपरिषदेने आपापल्या ताब्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, विज वितरण कंपनीने चतुर्थी काळात लोड शेडींग करु नये, विज वाहिन्यावरील फांद्या तोडाव्यात, गणपती विसर्जनाच्या ठिकाणची झाडी तोडून साफसफाई करावी, तहसिलदार कार्यालयाकडून फटाके परवानाधारकांची लायसन्स तपासावीत, शुभेच्छा बॅनर लावणा-यांनी नगरपरिषदेच्या परवानगीने व वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, बॅनरपेक्षा एलईडी स्क्रीनचा वापर करावा, गणेशोत्सवामध्ये अग्नीशमन बंब ओरोस येथे न पाठविता तो शहरातच ठेवावा, निर्माल्य विसर्जनस्थळी असलेल्या कलशात टाकावे, प्लॅस्टिकच्य वस्तूंचा वापर करु नये तसेच शासनामार्फत कोरोनाबाबतीत होणारे नियम व अटींचे पालन करावे असे ठरविण्यात आले.