वेंगुर्ला तालुक्यात भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे वर्चस्व

       वेंगुर्ला तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप 12, बाळासाहेबांची शिवसेना 3, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना 6, राष्ट्रवादी काँग्रेस 1 आणि गाव पॅनेलचा 1 असे सरपंच निवडून आले. दरम्यान, भाजप व बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली होती. त्यामुळे तालुक्यात सर्वाधिक जागा युतीकडे राहिल्या आहेत.

      तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींपैकी 22 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन मतमोजणी वेंगुर्ला तहसिल कार्यालयात पार पडली. तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी शिरोडा, रेडी, उभादांडा, म्हापण, परुळेबाजार, तुळस, होडावडा, आडेली या ग्रामपंचायतींसाठी मोठी चुरस पहायला मिळाली. रेडी ग्रामपंचायतींवर रामसिंग राणे यांनी विरोधात 9 उमेदवार असताना सुद्धा पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. तर शिरोडा ग्रामपंचायतीमध्ये जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देत भाजपला मोठा धक्का दिला. उभादांडा ग्रामपंचायतीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे निलेश चमणकर व भाजपाचे रमेश नार्वेकर यांच्यात मोठी चुरस पहायला मिळाली. यात शेवटच्या फेरीत निलेश चमणकर यांनी आघाडी घेत विजय मिळविला. होडावडा ग्रामपंचायतीमध्ये बाळासाहेबांची शिवसेनेच्या रसिका केळुसकर विजयी झाल्या. तर याठिकाणी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पुनम नाईक यांचा पराभव झाला. कोचरा ग्रामपंचायतीमध्ये दिपक केसरकर यांचे स्विय सहाय्यक योगेश तेली यांनी विजय मिळवित माजी जि.प.सदस्य वंदना किनळेकर यांचे सुपुत्र विनित किनळेकर यांचा पराभव केला. परबवाडा, परुळेबाजार, कुशेवाडा, तुळस, आसोली याठिकाणी भाजपाने आपला गड राखण्यात यश मिळविले.

               वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायत निवणूक मतमोजणीच्यावेळी मेढा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे उमेदवार विनायक खवणेकर व अवधूत रेगे यांना 222 ही समान मते पडल्याने चिठ्ठी काढून उमेदवार निवडण्यात आला. ओवी काळसेकर या विद्यार्थीनीच्या हस्ते काढलेल्या चिठ्ठीच्या निकालात अवधूत रेगे विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.

Leave a Reply

Close Menu