मळगाव वाचन मंदिरात प्रा. उदय खानोलकर जयंती कार्यक्रम

कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर यांच्यासारख्या माणसाचा सहभाग लाभणं हे मोठ भाग्य होत. उदयसारखी माणसं पुनःपुन्हा होत नाहीत. जगात अनेक बुद्धिवादी तसेच प्रज्ञावंत माणसं असतील. मात्र उदय सर्वांहून वेगळाच होता. अत्यंत बुद्धिमान होताच, पण तेवढाच लीन होता. पुस्तक हेच त्याचं आयुष्य, तर वाचन हा त्याचा श्‍वास होता, असे प्रतिपादन भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी तथा वेंगुर्ला कलावलय नाट्यसंस्थेचे उपाध्यक्ष संजय पुनाळेकर यांनी केले. मळगाव येथील प्रा. उदय खानोलकर वाचन मंदिरतर्फे उदय खानोलकर जयंती कार्यक्रम वाचन मंदिरच्या रमाकांत खानोलकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुनाळेकर बोलत होते.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा कामगार अधिकारी शेखर पाडगावकर, वेंगुर्ला खर्डेकर कॉलेजचे प्रा. डॉ. आनंद बांदेकर, बँक ऑफ इंडियाचे निवृत्त व्यवस्थापक नंदकुमार प्रभू देसाई, उदय खानोलकर यांचे बंधू महेश खानोलकर, वाचन मंदिराचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, सचिव गुरुनाथ नार्वेकर, ग्रंथपाल आनंद देवळी, रविंद्रनाथ कांबळी, डी. के. गावकर, प्रा. राजू बांदेकर, चंद्रकांत जाधव यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

      डॉ. आनंद बांदेकर म्हणाले की, उदय म्हणजे ज्ञानाचं व पुस्तकांचं भांडार होतं. केवळ वाचनच नव्हे तर कथा, कादंबरी, कविता यांच्या वाचनानंतर त्याची समीक्षा कशी करायची, हे उदयकडूनच शिकावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष शेखर पाडगावकर म्हणाले, उदय हे मळगावचे भूषण होते. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्‍वरांच्या नावाने आळंदी ओळखली जाते, त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रात उदय खानोलकर यांचं समाधीस्थळ म्हणून हे वाचनमंदिर ओळखलं जाईल.

      सोशल मिडियाच्या जमान्यात युवावर्ग इंटरनेटकडे वळलेला असताना त्यांना पुन्हा एकदा पुस्तक वाचनाकडे वळविण्याचे काम वाचनालयांनाच करायचे आहे. हे काम उदय खानोलकर वाचन मंदिर करत असून त्यासाठी लागेल ती सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही महेश खानोलकर यांनी दिली.

      यावेळी बँक ऑफ इंडियाचे निवृत्त व्यवस्थापक नंदकुमार प्रभूदेसाई, डी. के. गावकर, ग्रंथपाल आनंद देवळी, रविंद्रनाथ कांबळी, चंद्रकांत जाधव यांच्यासह उदय प्रेमींनी आठवणींना उजाळा दिला.

      प्रास्ताविक वाचन मंदिरचे अध्यक्ष हेमंत खानोलकर यांनी केले व वाचन मंदिरच्या वाटचालीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रा. राजू बांदेकर यांनी तर आभार सचिव गुरुनाथ नार्वेकर यांन मानले.

Leave a Reply

Close Menu