आजगांव केंद्रशाळेला दीडशे वर्षे झाल्याने शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे तीन दिवशीय आयोजन केले होते. यावेळी खासदार विनायक राऊत, माजी आमदार शंकर कांबळी, उद्योजक भाई मंत्री, ज्येष्ठ साहित्यिक सुनिलकुमार लवटे, माजी सभापती चंद्रकांत गावडे, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, माजी उपसभापती चंद्रकांत कासार, आजगाव माजी सरपंच सुप्रिया मेस्त्री, नुतन सरपंच यशश्री सौदागर, भोमवाडी सरपंच विद्या वाडकर-वराडकर, आबा सावंत,मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, सुरेश शेटये, केंद्रप्रमुख शिवाजी गावीत, महादेव देसाई, कमलाकर ठाकूर, मुख्याध्यापिका ममता जाधव, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अण्णा झांट्ये, सचिव विलासानंद मठकर, वासुदेव बेहरे, संगीता बेहरे उपस्थित होते. पहिल्या दिवशी कै.नरहरी उर्फ बाब्या पांढरे मित्रमंडळाच्यावतीने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साकारण्यात आलेल्या भव्य शाळा प्रवेशद्वाराचे उद्घाटन संपन्न झाले.
सिधुदुर्ग जिल्ह्यात दीडशे वर्षे झालेल्या केवळ तीन मराठी शाळा असून त्यात आत आजगांव शाळेचा समावेश आहे. हे आजगांवचे भूषण असून शाळेने दर्जेदार शिक्षणाबरोबर सुसंस्कृतीचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. या शाळेत रशियातून एक विद्यार्थी प्रवेश घेतो, ही बाब जिल्हावासीयांना गौरवास्पद असल्याचे सांगत दीडशे वर्षापूर्वी कोणत्याही प्रकारची सुविधा नसताना ब्रिटिशांच्या नजरकैदेत देश असताना दूरदृष्टी ठेऊन ज्या व्यक्तींनी शिक्षणाची ज्ञानगंगा येथे आणली, त्या सर्वांबाबत खासदार राऊत यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. रांगोळी, विज्ञान तसेच जुन्या संग्रहीत वस्तूंचे प्रदर्शन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कृतज्ञता सत्कार अशा भरगच्च कार्यक्रमांनी हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व शालेय समितीच्या पदाधि-यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन सुरज आजगांवकर यांनी केले.