स्वच्छतेच्या बाबतीत वेंगुर्ला शहर अग्रेसर झाले आहे. तशीच खेळांमध्ये वेंगुर्ला आपले नाव कमवेल. स्वच्छतेची सवय मुलांमध्ये लागावी यासाठी या पारंपरिक खेळाबरोबरच वेंगुर्ला नगरपरिषदेने स्वच्छतेतील काही खेळ काढले आहेत. स्वच्छ वेेंगुर्ला सोबत सुदृढ वेेंगुर्ला करताना हे खेळ ‘माझा वेंगुर्ला‘ने मुलांपर्यंत पोहचवावेत असे आवाहन ‘खेळ आठवणीतले‘ या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले.
‘माझा वेंगुर्ला‘ तर्फे कॅम्प येथील नगरपरिषदेच्या क्रीडांगणावर आयोजित केलेल्या ‘खेळ आठवणीतले‘ या उपक्रमाचे उद्घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते 24 डिसेंबर रोजी झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, जगन्नाथ सावंत, पंचायत समितीचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर, लोकमान्य सोसायटीचे पुरुषोत्तम राऊळ, प्रसिद्ध चित्रकार सुनिल नांदोसकर, मुक्तांगणच्या संचालिका मंगल परुळेकर, हॉटेल व्यावसायीक शैलेश शिरसाट, माझा वेंगुर्लाचे राजन गावडे आदी व्यासपिठावर उपस्थित होते. तिन दिवस चालणाऱ्या या खेळांमध्ये खो-खो, लंगडी, आट्यापाट्या, तळ्यात-मळ्यात, काजूंचे खेळ, लगोरी, आट्याकाट्या, ताईचा रुमाल, टायरने खेळणे, विटीदांडू आदी पारंपरिक खेळ खेळण्यात आले. यावेळी हजाराहून अधिक आबालवृद्धांनी सहभागी होत खेळाचा आनंद लुटला.