पत्रकारितेतील सर्वोच्च असा राज्यस्तरीय सन २०२२ चा मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार वेंगुर्ला येथील पत्रकार सुरेश कौलगेकर यांना घोषित झाला होता. या पुरस्काराचे वितरण देवगड-पोंभूर्ले येथे ६ जानेवारी रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रविद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी अध्यक्ष रविद्र बेडकिहाळ, पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते करण्यात आले.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने राज्यस्तरीय उत्तर महाराष्ट्र, कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा विभागातून आठ पत्रकारांना पुरस्कार देण्यात येतात. कौलगेकर यांनी कोकण सारख्या ग्रामीण भागातील अनेक सामाजिक विषयांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक दुर्लक्षित घटकांना समाजात स्थान व त्याच्या प्रश्नांना व्यासपीठ देण्याचे कार्य केले आहे. सामाजिकतेबरोबरच क्रीडा, शिक्षण, साहित्य, पर्यटन, कृषी, क्राईम विषयक घटना यांना पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय दिला या त्याच्या सर्वांगीण कार्याबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार देण्यात आला. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, जेष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, पोंभुर्लेच्या सरपंच प्रियांका धावडे, माजी सरपंच सादिक डोंगरकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव व कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, सुधाकर जांभेकर आदी उपस्थित होते.