वेंगुर्ल्याच्या वाढत्या पर्यटनातील मुख्य प्रकल्प असलेल्या बहुचर्चित झुलत्या पुलाचे काम पूर्ण झाले असून हा पुल पर्यटकांना आकर्षित करीत आहे. झुलता पुल अधिकृत पर्यटनासाठी सुरू झाला नसला तरी सध्या याचे व्हिडीओ, फोटो सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. दरम्यान, सध्या पर्यटनाचा हंगाम असल्याने हा पुल पहाण्यासाठी येथे पर्यटकांची गर्दी होत आहे.
तत्कालीन पालकमंत्री व आताचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी या झुलत्या पुलासाठी निधी मंजूर केला होता. पर्यटन विषयक काही मुख्य प्रकल्पांपैकी दीपक केसरकर यांच्या समृद्ध कोकण या व्हीजनमधील वेंगुर्ल्यातील हा झुलता पुल. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे हा पुल बरीच वर्षे रखडला होता. त्यावरुन अनेकांनी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर वारंवार टीका केली होती. दरम्यान, आता महाराष्ट्र राज्याचे मंत्री झाल्यानंतर केसरकर यांनी पुलाच्या कामाला अधिक गती आणली आणि आता पुल साकारला आहे.
अरबी समुद्र व मांडवी खाडीच्या संगमावर हा झुलता पुल असून याकडे पर्यटक आकर्षीत होत आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम जोरदार सुरु असल्याने शांत व सुरक्षित पर्यटनासाठी अनेक पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहे. वेंगुर्ल्यात आल्यानंतर यावर पुलावर जाऊन फोटो आणि व्हिडीओ काढण्याचा मोह त्यांना आवरू शकत नाही. सध्या वेंगुर्ल्याच्या पर्यटनाच्यादृष्टीने गतिमान विकास होत आहे. यात हे पूल मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.