मानसिक आजारांचा सामना एकत्रितपणे करूया…!

 मानसिक आजारांबाबतच्या गैरसमजांमधला एक प्रमुख गैरसमज असा आहे की – गरीब, अशिक्षित, खेडवळ, ग्रामीण भागातल्या लोकांना मानसिक आजार होतात. मानसिक आजाराने त्रस्त असलेली व्यक्ती विचित्र दिसते, चेहऱ्यावरून ओळखू येते. यामुळे आपल्या कानांवर काही वाक्यं पडतात. ती अशी – वाटत नाही हो, त्याला मानसिक आजार असेल असं!  एवढं सुशिक्षित घराणं आहे, त्यांच्या मुलाला कसा काय मानसिक आजार झाला काही कळत नाही! चांगली श्रीमंती आहे घरात आणि डिप्रेशन यायला काय झालंय? किंवा सगळं तर अगदी सेटल्ड आहे आणि ह्यांना कसली आलेय आता anxiety?

      आपण सगळ्यांनी हे पाहिलंच आहे की, मानसिक आजार होण्यामध्ये अनुवांशिकतेबरोबरच अनेक मनो-सामाजिक घटकांचा सहभाग असतो. त्यामुळे आपल्यापैकी कोणालाही मानसिक आजार होऊ शकतो. साधारणपणे विशिष्ट मानसिक आजार विशिष्ट वयातल्या व्यक्तींना होताना आढळले तरी कुठल्याही वयात मानसिक आजार उद्भवू शकतात. मानसिक आजार कोणाच्या जाणीवपूर्वक दोषांमुळे होत नाहीत. पाप – पुण्याच्या हिशोबाने मानसिक आजार होणार की नाही याच्या शक्यतेची गणितं ठरवता येत नाहीत. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक अशा सर्वच पातळ्यांवरच्या काही विशिष्ट कमतरता – त्रुटी आणि आधिक्य यांच्या सरमिसळीतून मानसिक आजारांची निर्मिती होत असते. संशोधनातून मानसिक आजार होण्या – न होण्याच्या शक्यतांची मांडणी केली गेली आहे. तसंच मानसिक आजारांना प्रतिबंध करण्याचे काही उपाय शोधून काढले आहेत. मानसिक आजार झाल्यानंतर त्यातून सुधारणेसाठीचे काही मार्ग सांगता येऊ लागले आहेत. त्यामध्ये ठोस अशी औषधं आणि परिणामकारक मानसोपचार यांचा समावेश आहे. मात्र ह्या शक्यतांना फाटा देऊन मानसिक आजार आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो – कधीही होऊ शकतो. कारण विशिष्ट परिस्थितीत मानसिक आजार न होण्याची जशी शक्यता आहे, तशी अगदी कमी प्रमाणात का होईना तो होण्याचीही शक्यता आहेच. तसंच तो होण्याची जास्त शक्यता असेल तरीही न होण्याचीही शक्यता उरतेच. शक्यतांचं प्रमाण आपण सांगू शकतो. त्यावर 100% अचूक गणित मांडता येत नाही.

      साथीच्या रोगांप्रमाणे मानसिक आजार निश्‍चितच संसर्गजन्य नाहीत. तरीही मनो-सामाजिक घटकांचा त्यांच्या निर्मितीमध्ये असणारा मोठा सहभाग लक्षात घेता आपण ज्या प्रकारच्या कौटुंबिक – सामाजिक वातावरणात राहतो-वाढतो त्या अनुषंगाने वेगळ्या प्रकारच्या संसर्गाची शक्यता वाढू किंवा कमी होऊ शकते. म्हणूनच मानसिक आजारांचा सामना एकत्रितपणे करणं फार आवश्‍यक आहे. ज्यामुळे आजाराने त्रस्त व्यक्तीला पाठिंबा मिळेल, सुधारणेच्या दीर्घकालीन प्रक्रियेत साथ मिळेल. आजाराने त्रस्त व्यक्तीच्या कुटुंबियांना त्या व्यक्तीची काळजी घेताना अधून मधून मोकळीक मिळेल, त्यांना स्वतःचे ताण कमी करण्याच्या दृष्टीने मदत घेता येईल. स्वतःचं स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी आवश्‍यक वेळ – ऊर्जा – पैसा – साधनं त्यांना उपलब्ध होतील.

      मानसिक आजारांचा एकत्रित सामना करण्यातला सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे विविध वयोगटातल्या, आर्थिक – सामाजिक स्तरातल्या सर्व समाज घटकांचं psycho education प्रत्यक्षदर्शी अनुभवांतून व्यवस्थितपणे होईल. अशा समाजात मानसिक अस्वास्थ्य आणि आजारांची लक्षणं वेळीच ओळखून त्यांचा स्वीकार केला जाण्याची शक्यता कैक पटींनी वाढते. योग्य वेळेत औषधोपचार घेण्यात कलंकित दृष्टीकोनामुळे येणारा अडथळा बऱ्याच प्रमाणात कमी होईल. अर्थातच समाज मन हळूहळू “एकमेकां साह्य करू, अवघे धरूं सुपंथ” याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने घडत जाईल.

– मीनाक्षी (मानसोपचार तज्ज्ञ)

अधिक माहितीसाठी संपर्क : सहज ट्रस्ट

फोन – 02363-299629/9420880529

Leave a Reply

Close Menu