भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापनदिन वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या क्रॉफर्ड मार्केट इमारतीवरील राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी बॅ. खर्डेकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून संचलनही करण्यात आले. वेंगुर्ला नगरपरिषद स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल करीत आहे. यात नगरपरिषदेचे कर्मचारी आणि सुजाण नागरिक यांची मेहनत आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी अमूल्य योगदान देणारे स्वच्छता कर्मचारी आणि काही नागरिकांचा प्रातिनिधिक सत्कार केला. तसेच स्वातंत्र्यसेनानी कै.गणेश महादेव गुरव यांचे सुपुत्र विजय गणेश गुरव यांचादेखील सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव म्हाकवेकर यांनी केले. या कार्यक्रमानंतर निशाण तलाव येथेही मुख्याधिकारी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.