मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळाने शिरोडा येथील वि. स. खांडेकरांच्या स्मारकाला भेट दिली. याचेच औचित्य साधून संस्थेच्या ऑफिसमध्ये वि. स. खांडेकरांच्या साहित्यावर एक छोटेखानी कार्यक्रम झाला. कौलापुरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. साहित्यिक वृंदा कांबळी यांचा संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिक अजित राऊळ सर यांचाही सन्मान करण्यात आला. वृंदा कांबळी यांनी वि. स. खांडेकरांनी मराठी साहित्यात रूढ केलेल्या रूपककथा या वाङ्मय प्रकाराची ओळख करून दिली. प्रितम ओगले, माधवी मातोंडकर, फाल्गुनी नार्वेकर, देवयानी आजगावकर, महेश राऊळ, ॲड. चैतन्य दळवी, संजय पाटील, आदिनी रूपककथांचे अभिवाचन केले. साक्षी वेंगुर्लेकर यांनी वि. स. खांडेकरांच्या साहित्याचा आढावा घेतला. अजित राऊळ यांनी वि. स. खांडेकरांचा जीवनपट उलगडला. प्रा. सचीन परूळकर यांनी आभार मानले.
यावेळी पी. के. कुबल, त्र्यंबक आजगावकर, सचिन दळवी, जे. जी. पाटील, स्वप्नील वेंगुर्लेकर, संजय पाटील, सोनाली नाईक, संकेत येराजी, सत्यम गडेकर, जान्हवी कांबळी, विकास कांबळी आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते. वि. स. खांडेकर स्मारकामधील वि. स. खांडेकरांविषयी कलात्मकतेने व कल्पकतेने मांडणी केलेल्या माहितीने सर्वजण प्रभावित झाले. माणसातील माणुसपण जपण्याचे मूल्य संवर्धन उर्जा केंद्र म्हणजे गुरुवर्य वि.स.खांडेकर स्मृती संग्रहालय अशी आनंदयात्री मंडळातील सदस्यांची भावना होती.