महिला दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला न.प.च्या कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या महिला स्वयंसहाय्यता बचत गटांचा स्नेहमेळाव्याचे उद्घाटन महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकिय संचालिका प्रज्ञा परब यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी सामंत, डॉ.प्रा.धनश्री पाटील, न.प.च्या प्रशासकिय अधिकारी संगिता कुबल आदी उपस्थित होते. महिलांसाठी शासनाकडून मिळणा-या सवलतींचा लाभ महिलांनी घेऊन सक्षम बनावे असे प्रतिपादन प्रज्ञा परब यांनी केले. डॉ.अश्विनी सामंत यांनी महिलांना आरोग्यविषयक शासनाकडून मिळणा-या सोयी व सुविधा यांची माहिती देत महिलांनी वेळेत आरोग्य तपासणी करून घ्यावी असे स्पष्ट केले.
या कार्यक्रमांत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सानिया आंगचेकर, संस्कृती गावडे, स्नेहा नार्वेकर, पूजा धुरी, निरजा मडकर, फाल्गुनी नार्वेकर यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.प्रा.धनश्री पाटील यांनी न.प.मार्फत ‘पर्यावरण दुत‘ म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच वेंगुर्ला न.प. आयोजित ‘कचयातून कल्पकता‘ या स्पर्धेचा बक्षिस वितरण करण्यात आला. यानंतर निरजा माडकर हिने गणेश वंदना, भटवाडी शाळा नं.२च्या मुलांनी ‘स्वच्छ भारत अभियान‘ यावर एक उत्कृष्ट पथनाट्य सादर केले. बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्लॅस्टीक बंदीवर पथनाट्य सादर केले. न.प.ने बचत गटांच्या महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांची कला सादर करण्यासाठी एक मंच दिला. महिलांनी आपल्या बचत गटांमार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन त्याचा आनंद घेतला.
यावेळी महिला स्वयंसहाय्यता बचत गटामार्फत प्रशासकिय अधिकारी संगिता कुबल, विलास ठुंबरे, अतुल अडसूळ व मनाली परब यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन संगिता कुबल, शिवानी ताम्हणेकर यांनी केले. मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली न.प.अधिकारी, कर्मचारी, सा.किरातच्या संपादक सीमा मराठे, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, फोटोग्राफर रवि वारंग व साऊंड सिस्टीम चालक भानुदास मांजरेकर यांचे तसेच दै. तरुण भारतचे सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख शेखर सामंत व शिक्षक बाळासाहेब पाटील यांनी न.प.च्या कार्यक्रमासाठी केलेल्या सहकार्याबद्दल न.प.च्यावतीने संगिता कुबल यांनी आभार मानले.