सिधुदुर्गातील प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक, कथा व कादंबरी लेखिका वृंदा कांबळी यांचा ‘अस्तित्व असेही‘ हा कथा संग्रह वाचकांच्या भेटीला उपलब्ध झाला आहे. हा कथासंग्रह कणकवली येथील प्रसिद्ध विघ्नेश प्रकाशनने प्रकाशित केला आहे.
या कथासंग्रहात वीस लघुकथा असून त्यांचे विषय वेगवेगळे आहेत. तर दुस-या विभागात १७ रुपक कथा आहेत. वृंदा कांबळी यांचा हा पाचवा कथासंग्रह व बारावे पुस्तक आहे. गेली वीस वर्षे त्या सातत्याने विविध स्वरुपातील लेखन करीत आहेत. स्वानंदासाठी लेखन करून न थांबता साहित्यिकसंस्थांमधून त्या सतत कार्यरत असतात. वेंगुर्ला तालुक्यामध्ये आनंदयात्री वाङ्मय मंडळाची स्थापना करून साहित्यविषयक चळवळ निर्माण करीत नवोदितांना व्यासपिठ मिळवून दिले आहे. त्रैवार्षिक साहित्य संमेलनासारखे उपक्रम राबवून साहित्यविषयक अभिरूची जोपासत आहेत. वाचन चळवळ वृद्धींगत करण्यासाठीही मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत आहेत. यापूर्वीची त्यांची पुस्तके वाचकप्रिय झालेली आहेत. आकाशवाणीवरून त्यांच्या कथांचे कथाकथनांचे कार्यक्रमही रसिकमान्य झालेले आहेत. अनेक पुस्तकांना पुरस्कार लाभलेले आहेत. रसिक वाचक याही पुस्तकाचे स्वागत करतील असा विश्वास वृंदा कांबळी यांनी व्यक्त केला.