पोलिस स्टेशनमधील भित्तीचित्रे लक्षवेधी

वेंगुर्ला पोलीस स्टेशन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय बनले आहे ते म्हणजे पोलीस स्टेशनच्या गेटबाहेर तसेच पोलीस स्टेशन परिसरातील भिंतीवर नागरिकांना गुन्हे व त्याबाबतचे मार्गदर्शन देणारी भित्ती चित्रे यामुळे. ही भित्तिचित्रे सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ठरली आहेत. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी ही संकल्पना राबविली असून पोलीस स्टेशनच्या आवारातील भिंतीवर काढण्यात आलेल्या भित्तीचित्रात कोणत्या गुन्ह्याप्रमाणे कोणती खबरदारी घ्यावी, याचे मार्गदर्शन करणारी माहिती देण्यात आली आहे. यामुळे वेंगुर्ला पोलीस स्टेशन अधिक आकर्षक बनले आहे.

    पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदाराने नेमके कुठे जावे, कोणाला भेटावे, तक्रार कुणाकडे द्यावी. त्याची माहिती त्याचप्रमाणे सध्या सर्रासपणे घडणा­या वेगवेगळ्या गुन्ह्यात नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी याचे सचित्र माहिती देणारी भित्तीपत्रके वेंगुर्ला पोलीस स्टेशनच्या इमारतीवर झळकली आहेत. पोलीस स्टेनशच्या गेटवर पुरूष व महिला पोलीस कर्मचा­यांच्या वेशातील चित्रे दोन्ही बाजूस असल्याने हेच पोलीस स्टेशन हे या चित्रावरून लगेच लक्षात येते. अशा पद्धतीने परिसर स्वच्छतेसह टापटिप केलेले वेंगुर्ला पोलीस स्टेशन नव्या ढंगात सज्ज आहे. अशा स्वरुपाची नागरिकांसाठी माहिती देणारे सिंधुदुर्गातील वेंगुर्ला पोलीस स्टेशन इतर पोलीस स्टेशनसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरू शकते यात शंका नाही.

Leave a Reply

Close Menu