श्री दत्तमाऊली पारंपरिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण मंडळ सिंधुदुर्ग यांच्यावतीने सुरु असलेल्या ‘प्रवास दत्तमाऊलीचा सोहळा त्रै वर्षे पूर्तीचा‘ या उपक्रमांतर्गत स्वयंभू मंगल कार्यालय मठ येथे भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात सुमारे ३५ दात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला. आरोग्य शिबिरावेळी दंत चिकित्सा, रक्त व नेत्र तपासणी, माफक दारात चष्मा वाटप, डायबिटीस तपासणी, मोफत औषधे वाटप आदी सुविधा देण्यात आल्या.
दशावतार क्षेत्रातील एका संस्थेकडून केला जाणारा रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम म्हणजे दशावताराच्या भविष्याची नांदी असल्याचे उद्गार मठ येथील डॉ.सुदिश सावंत यांनी काढले.
उद्घाटनप्रसंगी सावंतवाडी युवा संस्थेचे अध्यक्ष देवा सूर्याजी, बाळासाहेब शिवसेना मठ शाखा अध्यक्ष अरविद बागायतकर, ग्लोबल फाऊंडेशनचे गुरु देसाई यांच्यासह श्री दत्तमाऊली पारंपरिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे सदस्य उपस्थितीत होते. ग्रामीण भागातील गरजू लोकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने या शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराच्या माध्यमातून सेवा देण्यासाठी दंत चिकित्सक डॉ. अपूर्वा ठाकूर, प्राथमिक आरोग्य तपासणी डॉ. दत्तप्रसाद प्रभू व डॉ. प्रणव प्रभू, आरोग्य विभागाचे डी.व्ही.करंबळेकर, सावली वेंगुर्लेकर, रेश्मा नाणचे, श्रद्धा सावंत यांनी काम पाहिले तसेच नेत्रतज्ज्ञ डॉ. मिनर्वास परब, महालब सिंधुदुर्गचे उमेश गावडे यांनी सुविधा उपलब्ध करून दिली.