आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला-कॅम्प येथील श्री शिवाजी प्रागतिक प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या महिला पालकांसाठी तृणधान्यांपासून पौष्टिक पदार्थांवर पाककला स्पर्धा घेण्यात आली. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत सुमारे ३० महिलांनी सहभाग घेतला. सहभागी स्पर्धकांनी नाचणी, गहू, तांदुळ, ज्वारी, बाजरी, वरी या तृणधान्यापासून चविष्टपदार्थ करून आणले होते. स्पर्धेत निकिता वेंगुर्लेकर-प्रथम, दिपाली मराठे-द्वितीय, सीमा म्हेत्रे-तृतीय, कावेरी पवार-चतुर्थ तर वैदेही राऊळ यांनी पाचवा क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे परिक्षण वीरधवल परब, झिलू घाडी व निशा निकेश पवार यांनी केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलिमा परब, शिक्षणप्रेमी वायंगणकर, स्मिता कोणेकर यांच्यासह पालक उपस्थित होते. अश्विनी देसाई यांनी सर्वांचे स्वागत केले. मुख्याध्यापक खानोलकर यांनी प्रास्ताविक तर वंदना शितोळे यांनी आभार मानले.