पाटील सरांच्या पूजाची कलासक्त वाटचाल…

या लेखातून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या  वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे गावातील मुकबधीर चित्रकाराची ओळख करून देणार आहे. या कोकणकन्येचे नाव पूजा रुपाजी धुरी. तर आईचे नाव सौ. रुपाली धुरी. पूजा धुरी हिचा जन्म 8 जानेवारी 1996 साली वेतोरे गावात झाला. पूजाचे आईवडील दिवसभर वाडवडिलार्जीत सामूहिक शेतात राबून वर्षभर जेमतेम चौघांना पुरेल एवढे तांदूळ पिकवतात. या कामात लहानपणापासून पूजा आई वडिलांना आजही मदत करते. जेव्हा शेतात भरपूर कामे असतात म्हणजे खासकरून लावणीच्या वेळी पूजा घरातील सर्वच कामे करते. इतरवेळी आई आणि पूजा असे दोघं मिळून कामे करतात. लग्नाच्या मोसमात जेवणाच्या भरपुर ऑर्डर असतात तेव्हा आई तिथे तिच्या ग्रुप सोबत जाते व त्या सगळ्यांजणी मिळून लग्न समारंभात एकत्र जेवण बनवतात तेव्हा घरातील सगळ्या कामाची जबाबदारी एकट्या पूजावर असते. पूजा हिचा दोन वर्षांनी लहान असलेला भाऊसुध्दा आई बाबांसमवेत शेतात काम करून त्यांना मदत करतो. आजही घरातील सगळाच खर्च आई-वडिलांच्या मेहनतीवर अवलंबून आहे. पूजा आता स्थानिक लोकांना परवडतील अशी चित्रे साकारून स्वतःच्या परिवारासाठी जसा जमेल तसा थोडा थोडा हातभार लावत असते.

      पूजाचे आईवडील दोघेही जन्मत: कर्णबधीर असले तरी पूजा स्वतः जन्मत:  कर्णबधीर नव्हती. पण दुर्दैवाने 5 वर्षाची असताना छोट्याशा आजाराने पूजाला ऐकू येणे बंद झाले. यामुळे घरातील सगळ्यांनाच दु:ख झाले पण आई-बाबा अतिशय दु:खी झाले, कारण ते स्वतः मूकबधिर असल्यामुळे आयुष्यभर आपण जे दु:ख सोसले तेच दु:ख आपल्या पूजाला भोगावे लागणार ह्याचा विचार करून ते अतिशय व्यथित झाले. या घटनेनंतर एक-दिड वर्षांनी शिरोडा येथील माऊली कर्णबधीर निवासी विद्यालय या शाळेतील दोन शिक्षक वेतोरे गावात येऊन त्यांच्या शाळेसाठी गावात कोणी मूकबधिर आहेत का? याचा शोध घेत असताना त्यांना गावातल्या लोकांनी सांगितले की, “धुरी परिवारात एक मूकबधिर मुलगी आहे.“

      त्यांचे ऐकून त्या दोन्ही शिक्षकांनी सरळ धुरी परिवाराचे घर गाठले व “घरात कोणी मूकबधिर मुलगी आहे का?” अशी विचारपूस करण्यास सुरुवात केली व ते पुढे म्हणाले  की, “आमची शिरोडा गावात माऊली कर्णबधीर निवासी विद्यालय नावाची शाळा आहे. तिथे आपण आपल्या मुलीस पाठवाल का?“

      आपली मुलगी वयाने लहान मूकबधिर व शाळा लांब असल्यामुळे पूजाचे आईवडील दोघेही शिरोड्यातील शाळेत पाठवण्यास तयार होईनात. पण सुदैवाने धुरी परिवारातील लहानग्या पूजाच्या गीता काकीने स्वतः पुढाकार घेऊन पूजाला शिरोड्यातील माऊली कर्णबधीर निवासी विद्यालयात पाठवण्यास घरातील सगळ्यांनाच प्रवृत्त केले. गीता काकीने समजावून सांगितल्यावर आईवडील लहानग्या पूजाला घरापासून लांब असलेल्या शाळेत पाठवण्यास तयार झाले. तेव्हा पूजाची काकी स्वतः पूजाला घेऊन वेतोरे गावापासून 22-23 किलोमीटरवर असलेल्या निसर्गरम्य गावात म्हणजे शिरोडा येथील माऊली कर्णबधीर निवासी विद्यालयात प्रवेश घेऊन दिला. आणि तिथेच लहानग्या पूजाने वसतिगुहात राहण्यास सुरूवात केली.

      याच शाळेत सुरुवातीलाच शिशू वर्ग व पहिल्या इयत्तेपासूनच प्राथमिक वर्गात इतर विषयाबरोबर पूजा हिला चित्रकलेचीसुध्दा आवड निर्माण झाली. तिची चित्रकला पाहून बाळासाहेब पाटील सरांनी पूजाला इतर विषयांसोबत चित्रकलेकडे भरपूर लक्ष देण्यास सांगितले. ते तिला आपुलकीने मार्गदर्शन करू लागले. ब्लॅक ॲण्ड व्हाईटच्या वेगवेगळ्या छटा चित्रात वापरायचे तंत्र तिला शिकवले. आणि याच काळात पूजाला संकल्प चित्रे काढण्याची आवड निर्माण झाली. ही आवड जोपासण्यासाठी पूजाने दररोज रंगाच्या विविध छटा वापरून वेगवेगळी संकल्प चित्रे काढू लागली. ही तिची चित्रे पाहून त्यातील लहान चुका दाखवून पाटील सर पूजाला नीट समजावून सांगत असत. शालेय अभ्यास चालू असतानाच दररोज चित्रकलेचा भरपूर सराव सुरू झाला. वयाच्या मानाने काढलेल्या चित्रांमधील प्रगल्भता व नैपुण्य पाहून पूजाल एलिमेंटरी व इंटरमिडिएट या दोन्ही परीक्षा देण्यास सांगितल्या. या दोन्ही चित्रकलेच्या परीक्षेत पूजा ए श्रेणी मिळवून पास झाली. तिचे हे यश पाहून पाटील सर अतिशय आनंदी झाले. शालेय जीवनात पूजाने असंख्य पुरस्कार व बक्षिसे मिळवली.

      शालेय जीवनात पूजाला तिच्या काकी म्हणजे कै. गीता धुरी यांनी मोलाची साथ दिली. पूजा लहान असल्यापासून त्या तिच्या मागे खंबीर उभ्या राहून त्यांनी तिचे शिरोड्यातील माऊली कर्णबधीर निवासी विद्यालयात ॲडमिशन घेताना व अधुनमधून तिच्याशी सतत संपर्क ठेवून उन्हाळ्यातील सुट्टीत घरी घेऊन येणे व शाळा सुरू होण्याआधी पुन्हा तिथे सोडून येणे ही सगळीच कामे पूजाच्या गीता काकी यांनी केली. तेव्हा पूजाला शैक्षणिक कारणांसाठी लागणारी कागदपत्र, सरकारी दाखले मिळविणे अशा कामात गीता काकींनी पूजाला मोलाची साथ दिली. शाळेत जेव्हा पालकांची मिटिंग असे तेव्हा पालक म्हणून गीता काकी नेहमीच हजर राहत असत.

      माऊली कर्णबधीर निवासी विद्यालयात शेवटच्या वर्षाला म्हणजे 2014-15 साली इयत्ता 10वी मध्ये पूजाने चित्रकला विषय घेऊन  एस.एस.सी. बोर्ड परीक्षा दिली. या परीक्षेत तिला फर्स्ट क्लास मिळाला तसेच सगळ्यात जास्त म्हणजे चित्रकला विषयात 100 पैकी 97 गुण मिळाले.

      आता एस.एस.सी. पास झाल्यावर चित्रकलेतील पुढचे उच्च शिक्षण कसे करायचे हा मोठा यक्षप्रश्‍न पूजा व तिच्या आई-वडीलांसमोर होता. पण फक्त नुसते कौतुक करणारे असतात तसे पाटील सर नसल्यामुळेच त्यांनी पूजाला स्वतःची मुलगी असल्यासारखेच मार्गदर्शन केले होते. पाटील सर स्वतः पूजाच्या घरी येऊन तिच्या आई वडिलांना भेटून दोघांना “आपल्या पूजाची चित्रकला अतिशय चांगली आहे. तिला कलेच्या उच्च शिक्षणासाठी चांगल्या महाविद्यालयात पाठवूया का?“ अशी विनंती केली.

      कलाशिक्षक पाटील सरांच्या म्हणण्यास होकार देऊन तेव्हा पूजाचे बाबा स्वतः पाटील सरांसमवेत पूजाला घेऊन सांगलीस दाखल झाले. तिथे कलाविश्व महाविद्यालयमध्ये फाऊंडेशन कोर्ससाठी प्रवेश घेतला. तसेच या महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहण्यासाठी पाटील सरांनी पूजा धुरी ही स्पेशल केस असा अर्ज करून मंत्रालयातून पूजासाठी प्रवेश मिळवून दिला. यासाठी पाटील सर सतत दोन महिने मुंबईतल्या सरकारी कार्यालयात फेऱ्या मारत होते. पण या दोन महिन्यात पाटील सरांनी स्वतःची जयसिंगपुरला राहत असलेल्या बहिणीकडे पूजाची राहण्याची सोय केली. 

      शासकीय वसतिगृहात पूजाने राहण्यास सुरूवात केल्यावर दररोज वसतिगृह ते महाविद्यालयात जाण्यासाठी स्थानिक सरकारी बसने प्रवास करू लागली. सुरूवातीला तिला फार भीती वाटायची याचे कारण लहानपणापासून पूजाला मूकबधिर मुलींसोबत राहायची सवय झाली होती आणि सांगलीमधील कलाविश्व महाविद्यालयात नॉर्मल मुले शिक्षण घेत असल्यामुळे तिथे सगळीच मुले व मुली ही बोलणारी होती व त्या सर्व मुलांमध्ये फक्त पूजा हीच एकटीच न बोलणारी मुकी मुलगी होती. हळूहळू तिला या सर्वांची सवय झाली व तिच्या मनातील सगळीच भीती नाहिशी झाली. बरोबरच्या विद्यार्थ्यांशी ओळख झाल्याने पूजा इतर सगळ्याच बोलक्या विद्यार्थ्यांमध्ये रमू लागली. त्या सर्वच मुलांनी खूप चांगले सहकार्य केलं. वर्गात प्रोफेसर्स जे काही शिकवायचे ते तिचे इतर नॉर्मल वर्गमित्र-मैत्रीणी पूजाला पुन्हा नीट समजावून सांगायचे. यामुळे पूजाला सगळेच विषय समजण्यात सोपे गेले.

      फाऊंडेशनच्या अभ्यासक्रमात तिची चित्रे हवी तशी काढता येत नव्हती हे तिच्या प्रोफेसरांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी पूजाला सांगितले की, तुला अजून भरपूर प्रॅक्टिस केली पाहिजे. हे मनावर घेऊन पूजाने ठरविले की कसेही करून आपली चित्रकला आणखीन सुधारलीच पाहिजे म्हणून मग दररोज पूजा महाविद्यालयातून वसतीगृहात परतल्यावर एक-दीड तास चित्रं काढण्याचा सराव करू लागली. त्यामुळे बराच फरक पडल्याने तिची चित्रकला पहिल्यापेक्षा भरपूर सुधारली. पूजा फाऊंडेशनच्या वर्गात शिकत असताना तिला निसर्गचित्र (Nature) आणि वस्तू चित्र (Object) हे विषय फार आवडत होते.

      याच दोन्ही विषयांवर पूजा भरपूर सराव करत गेल्याने तिला या विषयात चांगली गोडी निर्माण झाली आणि पूजा कलाविश्‍व महाविद्यालयामधील फाऊंडेशनची परीक्षा चांगले गुण घेऊन पास झाली. यापुढे तिला आणखीन कला शिक्षण घ्यायची इच्छा होती पण घरची आर्थिक परिस्थिती तिच्या या शिक्षणासाठी पोषक नसल्यामुळे तिने पाटील सरांना “आता हे शिक्षण पुरे!“ असे सांगितल्यावर कलाशिक्षक पाटील सर भडकले व पूजाला म्हणाले, “पूजा! आता तु हे कलाशिक्षण सोडायचे नाही. तुझी चित्रकला खरोखरच सुदंर आहे. तु कसेही करून इथे पाच वर्षे G.D.Art अभ्यासक्रम पुर्ण कर!“

      पाटील सरांनी असे समजावल्यावर पूजाला धीर आला. तिने मनावर घेतले आणि मग तिचे संपूर्ण पाच वर्षाचे कलाशिक्षण पुढे पूर्ण झाले. या संपूर्ण काळात तिच्या वर्गातील सर्वच मित्र-मैत्रिणींनी छान साथ दिली हे पूजा कधीच विसरू शकत नाही.

      पूजा आजही व नेहमीच नम्रतेने सगळ्या माध्यमातून व्यक्त होताना ती म्हणते की, “गुरूवर्य पाटील सर आजतागायत माझ्या पाठिशी खंबीर पणे उभे आहेत आणि मला मार्गदर्शन करतात. त्यांनी वेळ पडली तर आपल्या घरी सुद्धा अनेकवेळा राहायला दिले व त्यांचे कुटुंबियांनी मला आपलेपणाने जेऊ घातले.“

      2020 साली कुमारी पूजाचा G.D.Art (Painting) चा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर अंतिम परीक्षेत निकाल लागल्यानंतर संपूर्ण  महाराष्ट्र राज्यात पूजा ही अपंगामधून पहिली आली. हे पाटील सरांनी पूजा हिला स्वतः सांगितले तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. म्हणून त्यांनी स्वतः पूजाचा जाहिर सत्कार तिच्या घरीच तिच्या परिवारासमवेत केला. या सत्काराच्या वेळेस पूजाला कै. गीता काकीची भरपूर आठवण आली व तिचे मन दाटून आले.

      त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात व वेंगुर्ला तालुक्यातील अनेक गावात विविध स्तरातून पूजाचा सत्कार करण्यात आला. हे सगळे सत्कार होत असताना पाटील सरांनी शेखर सामंत यांच्या मदतीने ‘तरूण भारत’च्या माध्यमातून परिस्थितीने अतिशय गरीब असलेल्या पूजासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून मदतीसाठी आवाहन केल्यामुळे पूजाला मुंबईतल्या सावली ट्रस्टने 1 लाख रुपये कानाच्या  मशिनसाठी सहकार्य केलं. सावली ट्रस्टच्या समितीमधील ज्येष्ठांनी पूजाला उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करून भरपूर शुभेच्छा दिल्या. याचवेळेस नेमका कोरोनाचा लॉकडाऊन काळ होता. सावली ट्रस्टतर्फे कानाच्या मशिनसाठी खर्च मिळाला खरा पण ती मशीन वापरण्याआधी कानाची तपासणी करावी लागते. कोरोना काळात एस.टी. बसची सेवा बंद होती म्हणून पूजाला कोल्हापूरला कानाची तपासणी करुन घेण्यासाठी स्पिच थेरपी करण्यासाठी पाटील सर आपल्या दुचाकीवरून तीनवेळा पूजाला कोल्हापूरला घेवून गेले.

      हा लेख लिहिण्यासाठी मी जेव्हा पूजाला संपर्क करून व्हॉट्सअपवर तिच्याशी चॅट करून तिची मुलाखत घेण्याचे ठरविले. यासाठी मला तिची वहिनी सौ. मंजिरी धुरी यांनी सहकार्य केले.  

      “पूजा आतापर्यंत आपण कॅनव्हासवर अनेक चित्रे काढली. त्यामुळे आतापर्यंत नुसते कौतुक की त्यातून आपली काही अर्थप्राप्ती होते का?“ या प्रश्‍नावर “मी आता ज्या गावात राहते तिथे माझ्या शैलीतील पेंटिंग कोणी विकत घेत नाहीत, कारण मुख्य म्हणजे त्या पेंटिंगची किंमत जास्त असल्यामुळे व आमच्या गावात अशा पेंटिंगची आवड असलेला व चाहतावर्ग नसल्यामुळे माझी पेंटिंग विकली जात नाहीत. पण निसर्ग चित्रे, देवांची चित्रे आणि व्यक्तीची स्केच याला मागणी असल्यामुळे मी त्याच्या मागणीप्रमाणे चित्रे काढून देते. गणेश चतुर्थीच्या काळात मला भिंतीवरील चित्रांसाठी मागणी येते. पण मी अशा प्रकारची कामे करते यासाठी पाटील सरांचा विरोध असतो. ते मला नम्रपणे मार्गदर्शन करून सांगतात की, “पूजा! कॅनव्हास पेंटिंग हीच तुझी जगभर ओळख व्हावी असेच मला वाटते. भिंतीवरील चित्रामुळे कलाकराला हवे तेवढं महत्त्व मिळत नाही.“ तरी पूजाच्या कामावरचा विश्‍वास तिची कला नक्कीच तिला पुढे चांगला मार्ग दाखवेल.

      पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली आई-वडिलांच्या आशीर्वादाने समाजातील चांगुलपणावर विश्‍वास ठेवून पूजाने सुरु केलेली वाटचाल नक्कीच थोड्याशा कारणाने निराश होणाऱ्या तरुणांसाठी दिशादर्शक आहे.

व्हॉट्सअप शब्दांकन : सौ. मंजिरी धुरी

लेखन : रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी, आरवली-वेंगुर्ला

Leave a Reply

Close Menu