वेंगुर्ला आगाराचे सध्यस्थितीतील सुरू असलेले नूतनीकरणाचे काम हे चुकीच्या पद्धतीचे आणि निकृष्ट दर्जाचे असून चुकीचे अंदाजपत्रक असल्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप करत भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रान्ना देसाई यांच्या नेतृत्वाखाली सेवा शक्ती संघर्ष कामगार संघटनेच्या पदाधिकारी यांनी या कामाची पाहणी करत काम थांबवले.
राज्यशासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच एसटी आगाराच्या नूतनीकरणाची कामे सुरू आहेत. यात सुमारे १ कोटी ४४ लाख रुपये किमतीचे वेंगुर्ला एस.टी.आगाराच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान हे काम निकृष्ट असल्याचा आरोप भाजप प्रणित सेवा शक्ति संघर्ष कामगार संघाने करत १६ मे रोजी या कामाची पाहणी केली. यावेळी मुख्य एसटी डेपो येथे घालण्यात आलेले पत्रे चुकीच्या पद्धतीने घालण्यात आले असून ते निकृष्ट दर्जाचे आहेत. तसेच जुने असलेल्या लोखंडी छप्परालाच कलर काढण्यात आला आहे. यात काही ठिकाणी हे लोखंड सडलेल्या स्थितीत आहे. तसेच वर्कशॉपच्या ठिकाणी करण्यात येणारे काँक्रीटीकरणाचे काम सुद्धा चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिका-यांनी करत उपस्थित अधिका-यांना धारेवर धरले.
यावेळी सहाय्यक अभियंता अक्षय केकरे व कनिष्ट अभियंता गिरीजा पाटील यांच्या सोबत या संपूर्ण कामाची पाहणी करत जोपर्यंत विभागीय नियंत्रक अभिजित पाटील यांच्याशी बैठक होत नाही तोपर्यंत काम बंद करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधि-यांनी दिला आहे. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, संघटना उपाध्यक्ष भाऊ सावळ, आगार सचिव दाजी तळणेकर, सल्लागार मनोज दाभोलकर, विभागीय सहसचिव महादेव भगत, महिला संघटक सेजल रजपूत आदी उपस्थित होते.
या एसटी आगाराच्या निकृष्ट कामाबत २ दिवसांपूर्वी आगार प्रमुख यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली होती. गुरुवारी याची वस्तुस्थिती अधिकायांच्या निदर्शनास आणून दिली आहे. या आगाराचे जे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे याला आमचा विरोध असून याबाबत जोपर्यंत एसटी आगाराचे विभागीय नियंत्रक यांच्याशी चर्चा होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. – प्रसन्ना देसाई , भाजप जिल्हा उपाध्यक्ष