आपण सध्या एका संक्रमणकाळात आहोत, ज्या काळात जुनी मुल्यव्यवस्था ढासळत आहे आणि नवी मुल्यव्यवस्था आकाराला आलेली नाही. त्यामुळे एका विचित्र परिस्थितीला आपण सर्वचजण तोंड देत आहोत. या समस्येचं बटबटीत हिडीस स्वरूप सूचना सेठ प्रकरणातून पुढे आलं. आपला प्रवास हिरकणीपासून सूचना सेठपर्यंत झालाय. यावर काही आपण काही सामुहिक तसेच व्यक्तीगत प्रयत्न करू शकतो का, याचेच एक चिंतन!
अलिकडच्या काळात पालकसभेसाठी मला वक्ता म्हणून जेव्हा बोलावले तेव्हा माझ्या मांडणीच्या सुरवातीलाच मी एक प्रश्न विचारतो. “तुम्हाला तुमचं मुल कोण झालेलं हवंय? उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ झालेलं पण नातेसंबंधांत, भावजीवनात असंतुष्ट की कमी शिकलेलं, जेमतेम हातातोंडाची मिळवणी करणारं पण नातेसंबंधांत, भावजीवनात समाधानी?“ या प्रश्नावर श्रोत्यांचं एकमुखी उत्तर असतं, “कमी शिकलेलं असलं, जेमतेम हातातोंडाची मिळवणी करणारं असलं तरी चालेल, पण नातेसंबंधांत, भावजीवनात समाधानी असलेलं हवं!“ त्यावर माझं म्हणणं असतं, हे आपोआप घडणार नाही आपल्याला त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.
मुलाला त्याच्या भावी जीवनात समाधानी कसं व्हावं, हे जाणीवपूर्वक शिकवण्याची गरज आहे, हेच अनेकांना वाटत नाही. त्यामुळे त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न कोणी करत नाही. जसे मुलाच्या ॲकॅडेमिक करियरसाठी पालकांकडून प्रयत्न केले जातात, मुलासाठी चांगली शाळा शोधली जाते, शिक्षणाचं माध्यम काय असावं यासाठी काथ्याकूट केला जातो, मुल गुणवत्ता यादीत चमकावं, त्याला मेडिसिन, आयआयटीसारख्या कोर्सला ॲडमिशन मिळावी यासाठी दोन दोन वर्षेआधीपासून पालक प्रयत्न करत असतात, त्याप्रमाणे मुलाचे भावजीवन समृद्ध व्हावे यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अशा जाणीवपूर्वक प्रयत्नांची आवश्यकता आहे, हेच लक्षात येत नाही. कदाचित डिजीटलपूर्व काळातील मुलांचे संगोपन करताना त्याची गरज फारशी कधी जाणवली नाही हे एक कारण असू शकेल. पण आज आपण अशा कालखंडात रहात आहोत की जिथे आपल्या मुलांपर्यंत कायकाय पोचतंय आणि ते आपल्या मुलांत कोणते विचार तयार करतंय, हे आपल्याला कळणं अवघड होऊन बसलंय.
पुन्हा एकदा एक उदाहरण देऊन मुलाच्या भावजीवनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचा मुद्दा स्पष्ट करतो. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक कलेक्टर बाई होत्या. कलेक्टर म्हणजे उच्च विद्याविभूषित. त्या आपल्या कामातदेखील तत्पर होत्या. त्यांच्याविषयी एक दिवस एक बातमी छापून आली. त्या बाई एकदा काही कामासाठी मुंबईच्या सचिवालयात गेल्या होत्या. त्या तेथील जिना उतरत असताना त्यांचा नवरा जो आयपीएस अधिकारी होता, समोरुन आला. आणि त्याने कलेक्टरबाईंच्या पायात पाय घालून त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला. त्या दांपत्यात वाद निर्माण झाला होता, घटस्फोटाची प्रक्रीया चालू होती. हे अर्थातच कोणत्याही कुटूंबात घडू शकतं. पण लक्ष वेधण्याचा मुद्दा हा की एक आयपीएस अधिकारी आणि एक आयएएस अधिकारी आपल्यातील मतभेद कसे सोडवत आहेत? पायातपाय घालून! ज्या व्यक्ती एखाद्या जिल्ह्याची कायदा अन सुव्यवस्था हाताळू शकतात त्या व्यक्ती नातेसंबंधांतील मतभेद मात्र सभ्यतेने सोडवण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळेच हा मुद्दा अधोरेखित होतो की सुदृढ पद्धतीने नातेसंबंध हाताळणे, भावभावना हाताळणे हे कौशल्य शिकणे आवश्यक आहे.
हे कौशल्य काही तासिका किंवा विषय ठेवून विकसित करता येणार नाही. त्यासाठी मुलाशी संबंधित सर्वांचेच (पालक, शिक्षक, शेजारी, नातेवाईक) ओरीएंटेशन बदलण्याची आवश्यकता आहे. मुल ज्या घरात जन्माला येतं त्या घरातून संस्कार सुरू व्हायला हवेत, हे साहजिक आहे. संस्कार या शब्दाचा अर्थ देखील इथे स्पष्ट करतो. कारण संस्कार या शब्दाचा खूपच मर्यादित अर्थ लोक घेतात. एक उदाहरण देतो. अलिकडे बहुतेक मुले त्यांना पुरस्कार वगैरे मिळाला की व्यासपीठावर त्यांना पुरस्कार देणाऱ्याच्या पाया पडतात. पाया पडणे ही कृती झाली. पण तिच्यामागे नम्रता हे मुल्य नसेल तर त्या पाया पडण्याला काही अर्थ रहात नाही. तुम्ही पाया पडण्याचा बाह्य देखावा करण्याची गरज नाही. पण तुमच्यात नम्रता आली आहे का याचे चिंतन महत्त्वाचे. ज्यांच्यापासून तुम्हाला लाभ आहे, त्यांच्याशी तुम्ही नम्रपणे वागाल यात मोठेसे काही नाही. पण ज्यांच्याशी तुमचे मतभेद आहेत, त्यांच्याशी तुम्ही शालीनतेने वागता की नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आक्रस्ताळेपणा, उर्मटपणा म्हणजे स्वाभिमान नव्हे. त्यामुळे मतभेदाच्या मुद्द्यावर ठाम राहून विरोधी मतवाल्या माणसाला तुम्ही माणूस म्हणून प्रतिष्ठीत मानता की नाही, यात तुमच्या नम्रतेचा कस लागतो. संस्काराबाबत आणखी एक मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो. तो म्हणजे तुम्हाला काही श्लोक पुटपुटता येणे, तुम्ही काही रूढी पाळणे म्हणजे संस्कार नव्हे.
संस्कार म्हणजे मनात मूल्ये रुजवणे. त्या मूल्यांप्रती निष्ठा रुजवणे आणि मुल्यनिष्ठेनुरूप वर्तन होणे. संस्कारांची वरील व्याख्या वाचून हे काहीतरी खूप कठीण गुंतागुंतीचे प्रकरण आहे असा ग्रह होऊ शकतो. पण हे खरे म्हणजे आपल्यातील नैसर्गिक गोष्टींनाच पूर्ण विकसित होण्यासाठी वाव देणे आहे. तुमच्या घरात एक-दीड वर्षांचे मुल असेल तर तुमचा हा अनुभव असतो की तुम्ही तुमच्या कामावरून घरी परतता त्यावेळी तुमचे मूल तुम्हाला येऊन बिलगते. तुम्ही आल्याचा त्याला आनंद होतो. आपल्या माणसाला बघून आनंद होणे ही नैसर्गिक उर्मी आहे. पण आपण काय करतो? आपण बाहेरून येताना मुलासाठी काहीतरी खाऊ किंवा खेळणे वगैरे घेऊन येतो. आपण असे वारंवार केल्यानंतर एक दिवस असा येतो की मुल तुमची वाट बघण्याऐवजी तुम्ही काय आणता याची वाट बघतं. म्हणजे आम्हीच त्याच्या नैसर्गिक उर्मीला कृत्रिम गोष्टीकडे वळवता.
काही मंडळी मला अभिमानाने ऐकवतात की त्यांच्या पाल्याचा राग असा आहे की तो चिडतो तेव्हा कोणाचेच ऐकत नाही. तो त्याच्या स्वर्गीय आजोबांसारखा झाला आहे वगैरे वगैरे. हे कौतुक अप्रत्यक्षपणे मुलाच्या राग अमर्यादित व्यक्त करण्याला खतपाणी घालत असते. राग येणे ही नैसर्गिक गोष्ट आहे, हे खरे, पण केव्हा रागवायचे, कोणावर रागवायचे, किती रागवायचे, किती वेळ रागवायचे, राग कोणत्या पद्धतीने व्यक्त करायचा हे मात्र कौशल्य आहे. जाणीवपूर्वक शिकण्याचे आणि शिकवण्याचे कौशल्य आहे. मला इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो वाटतो तो म्हणजे आम्ही डिसअपॉयमेंटला आम्ही डिझॅस्टर नाही ना म्हणून बसत, हे बारकाईने तपासण्याचा. अनेकदा क्षुल्लक गोष्टीना आपण उगीचच प्रचंड महत्त्व देतो. असे वर्तन म्हणजे तुटलेले बिस्किट मिळाले म्हणुन ते फेकून देऊन अख्खे बिस्किट गमावून बसलेल्या आपल्यात बालकाचे वर्तन.
खरे म्हणजे तुमच्या पाल्याला तुम्ही देण्यासारखी अमुल्य गोष्ट म्हणजे नाही पचवायला शिकणे! ज्या गोष्टींची तुमच्या पाल्याला जरूरी नाही, अशा गोष्टी तुम्हाला परवडत असल्या तरी देऊ नका. अशा न देण्याने तुम्ही तुमच्या मुलाला वंचित करत नाही तर नाही पचवण्याची क्षमता देता. फक्त हे करताना सातत्य हवे, घरातील सर्व मोठ्या मंडळीत एकमत हवे. मुल नेहमी प्लेजर-पनिशमेंट तत्त्वावर काम करत असते. त्यामुळे तुम्ही त्याला एखादी गोष्ट नाकारलीत तर ते हट्ट करणार हे साहजिकच. पण तुम्ही पालक म्हणून त्याच्या हट्टाला बळी पडू नये हे महत्त्वाचे. तुम्ही हट्टाला बळी पडत नाहीत असे मुलाच्या लक्षात आले की ते हळूहळू हट्ट करायचे कमी करत जाते.
नाही पचवण्यासोबत दुसरं महत्त्वाचं कौशल्य म्हणजे सबुरी किंवा डिलेड ग्रॅटीफीकेशन. पूर्वीच्या पिढ्या हे कौशल्य परिस्थितीतून शिकत, आता ते जाणीवपूर्वक देण्याची आवश्यकता आहे. सबुरी म्हणजे धीर धरण्याची क्षमता. आज जिथे सगळ्या गोष्टी इंस्टंट मिळतात, तिथे सबुरी जाणीवपूर्वक शिकवणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे तुमच्या मुलाला हवी असलेली गोष्ट तात्काळ देऊ नका. जरी ती तात्काळ उपलब्ध करणे तुम्हाला शक्य असले तरी तात्काळ देऊ नका. हेदेखील तुम्हाला सातत्याने करावे लागेल.
अलिकडची सर्व पालकांची कॉमन तक्रार म्हणजे आपले मुल मोबाईल जास्त पाहते. त्याला माझे स्पष्ट उत्तर आहे की आम्ही त्याला वेळ देत नाही म्हणून ते मोबाईलकडे वळते. पालकत्व हे पालकालादेखील समृद्ध करणारी गोष्ट आहे. आपल्या सृजनशीलतेला वाव देणारी गोष्ट आहे. आपण रूची घेऊन पालकत्व निभावू लागलो तर आपल्यालाच अनेक गोष्टी सुचतील ज्या अंमलात आणून आम्ही आमच्या पाल्याचे भावजीवन समृद्ध करू शकू! (क्रमशः)
-डॉ. रुपेश पाटकर, मो. 9623665321