दशावताराचा उगम यक्षगानातून झालेला नाही, असे कठोर संशोधनाअंती ठामपणे सांगणारे डॉ. तुलसी बेहेरे आपल्यातून निघून गेल्याने दशावताराचे मोठे नुकसान झाले आहे. दशावतार कलेला राष्ट्रीयस्तरावर सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याला तोड नाही. ज्येष्ठ दशावतारी कलाकारांना मानधन मिळवून देण्यासाठीही त्यांनी सरकार दरबारी उंबरठे झिजविले होते. त्यांचा दशावतार कलेशी असलेला लळा सर्वश्रुतच आहे. दशावताराला सातासमुद्रापार नेण्यासाठी त्यांची नितांत गरज होती, असे भावोद्गार मान्यवरांनी तुळस येथे काढले.
तुळस कुंभारटेंब येथील बेहेरे यांच्या निवासस्थानी त्यांचा जयंती कार्यक्रम तुळस गाव व कुटुंबियांतर्फे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तुळस सरपंच रश्मी रामदास परब, पंचायत समितीचे माजी सदस्य संजय तांडेल, कुंभारटेंब युवक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आनंद तांडेल, सचिव तथा माजी सरपंच विजय रेडकर, ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार, तरुण भारत संवादचे प्रतिनिधी महेंद्र मातोंडकर, शेखर तांडेल, ग्रामपंचायत सदस्या. सौ. सावंत मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. तुलसी बेहेरे यांच्या पत्नी प्रा. रेखा बेहेरे यांनी केले. दशावताराचा जन्म यक्षगानातून झाला असावा, असा समज त्याकाळच्या अभ्यासकांमध्ये निर्माण झाला होता. हा गैरसमज आहे. दशावतार ही तळकोकणातील लोकांच्या सुखदुःखाशी नाते सांगणारी श्रमजीवी माणसांची अंगिभूत लोककला आहे. तिचा उदय तळकोकणातच झाला, त्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळेच त्यांनी दशावताराच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. सुमारे 25 वर्षे ते याच एका विषयावर झपाटल्यागत संशोधन करत होते. दशावताराचा संबंध ज्या कर्नाटकातील यक्षगानशी जोडण्यात येत होता, त्या यक्षगानचाही त्यांनी अगदी चिकित्सकपणे अभ्यास केला. दशावतारावर पीएचडी मिळवून दशावतार ही केवळ तळकोकणाची कला आहे, हे सिद्ध करून दाखविले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. दशावतार ते जगले. दशावतारावर अनेक पुस्तके लिहिली.
मुंबईत कोकणातील कलाकारांना एकत्र करून सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळाची स्थापना केली. कोकणातील दशावताराला दिल्ली दरबारी राजाश्रय मिळवून देण्यासाठी ते शेवटपर्यंत झटत राहिले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या मुलांना दशावताराचे धडे देण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. कोकणचा दशावतार दिल्ली, मुंबई व अन्य मोठ्या शहरात होण्यासाठीही ते कार्यरत असायचे. विजय रेडकर, महेंद्र मातोंडकर, तुळस सरपंच रश्मी परब यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. रेखा बेहेरे यांनीही अनेक आठवणी कथन केल्या. माणगावच्या यक्षिणी दशावतार नाट्य मंडळाने नाटक सादर केले.