रा.कृ.पाटकर हायस्कूल आणि रा.सी.रेगे ज्युनिअर कॉलेज, तंत्र व व्यवसाय अभ्यासक्रम येथे सन १९६४च्या १० वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन बॅचचे विद्यार्थी तथा शाळेचे माजी मुख्याध्यापक रा.पां.जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी गोव्यातील माजी शिक्षण उपसंचालक शरदचंद्र रेडकर, माजी विद्यार्थी तथा गोरेगांव रोटरी क्लबच अध्यक्ष बापू गिरप, उद्योजक पुष्कराज कोले, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, अॅड.गंगाधर सबनीस, जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक राजाराम राऊळ, सेवानिवृत्त दुकाने संस्था निरीक्षक किरण कुबल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साईप्रसाद नाईक, निकॉम कॉम्प्युटरचे संचालक प्रशांत निकम, गोरेगांव स्कुलचे माजी मुख्याध्यापक मोहन गिते, मुख्याध्यापक दादा सोकटे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी माजी विद्यार्थी बापू गिरप यांनी कॉम्प्युटर लॅबची संकल्पना आपल्या बॅचसमोर मांडली आणि बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे ऋण फेडण्यासाठी हात दिले. याच बॅचचा मी विद्यार्थी असून मला त्याचा शुभारंभ करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो. या शाळेच्या अन्य बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मातीशी असलेली नाळ जपून या शाळेत शिक्षण घेणाया विद्यार्थ्यांना शिक्षणात सक्षम करण्यासाठी विविध स्वरूपांत सहकार्य करून आपले ऋण फेडावे असे आवाहन रा.पां.जोशी यांनी केले.
कॉम्प्युटर लॅबचा उपयोग करून आधुनिक शिक्षणांत आपली प्रगती साधावी असे आवाहन शरदचंद्र रेडकर यांनी केले. पुष्कराज कोले यांनी आपली आई माया कोले यांच्या स्मरणार्थ शाळेचा ज्युबिली हॉलचे नुतनीकरणाचे काम करून हॉल विविध कार्यक्रमांसाठी सुसज्ज करण्याचे आश्वासन दिले. तर बापू गिरप यांनी या शाळेसाठी आणखीही मदत करण्याचा मनोदय व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून माध्यमिक परीक्षेतून या शाळेतून प्रथम तीन क्रमांक पटकाविणारे भूषण चव्हाण, लिखित हळदणकर, करण करंगुटकर, तर उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षा २०२४ मधून कला विभागातील सुजल गावडे, साहिल सावंत, देवेश परब, वाणिज्य विभागातील अपूर्वा पेडणेकर, कृपा खोबरेकर, मयुरी आरोलकर, व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील अनंत पवार, रिया डिचोलकर, फॅल्सी रॉड्रीग्ज यांना माजी विद्यार्थ्यांकडून रोख ५००, ३००, २००, शाळेकडून पेन तसेच १२ वीच्या प्रत्येक विभागांत प्रथम आलेल्या व दहावीत प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना उद्योजक पुष्कराज कोले यांच्याकडून प्रत्येकी ५०० रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी विजय पांगम, विठ्ठल सावंत, रामचंद्र घोगळे, माजी मुख्याध्यापक सुरेश गावडे, वसंत तांडेल, रमाकांत आरावंदेकर, पालक संघाचे अध्यक्ष जयवंत मालंडकर, दाभोली मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर, माजी विद्यार्थी बाबुराव खवणेकर, तुषार कामत, माजी कर्मचारी कमलाकांत सातार्डेकर यांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रा.महेश बोवलेकर यांनी तर आभार मुख्याध्यापक आत्माराम सोकटे यांनी मानले.