अपंगांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाया साहस डिसअॅबिलिटी फाऊंडेशनच्या माणगांव-स्वप्ननगरी येथील आर्थिक मंदीत सापडलेल्या काजू प्रक्रिया उद्योगाला पुनर्जीवित करण्यासाठी बजाज उद्योग समुहाकडून तब्बल २ कोटी २६ लाख रूपयांचा सीएसआर निधी मंजूर झाल्याने या प्रकल्पाला नवसंजीवनी मिळाली आहे. बजाजच्या या मदतीमुळे स्वप्ननगरीमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. एकूण मंजूर निधीपैकी कच्चा काजू बी खरेदी व इतर खर्चासाठी १ कोटी १० लाखांचा पहिला हप्ता साहसला अदा करण्यात आला.
यावेळी साहसच्या संस्थापक अध्यक्षा डॉ.नसिमादीदी हुझुरूक, खजिनदार अजीज हुझुरूक, विश्वस्त अॅड.नकुल पार्सेकर, साताराम पाटील, चार्टर्ड अकाऊटंट के.डी.पाटील, काजू प्रक्रिया उद्योग निरिक्षक मधुताई आदी उपस्थित होते. कोरोना आपत्तीमुळे अडचणीत सापडलेला हा उद्योग आणि ७५ दिव्यांगांच्या निर्माण झालेल्या रोजगाराची मोठी समस्या बजाज उद्योग समुहाने मदतीचा हात देऊन दूर केली आहे.