वेंगुर्ला शहरातील रामघाट रोड ते बंदर रस्ता, एमएसईबी कार्यालय ते कॅम्प मार्गे आडीपूल, कॅम्प ते हॉस्पिटल नाका मार्गे गणपती मंदिर, एस.टी.स्टॅण्ड ते निमुसगा या भागामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत जमिनीखालून विजवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. पथदिप उभारण्याच्या कामासाठी शासनाकडून विविध योजनांतर्गत नगरपरिषदेस निधी मंजूर झालेला आहे. परंतु नव्याने पथदिप उभारण्यास कमी उंचीवर असलेल्या विजवाहिन्यांचा अडथळा होत आहे. तसेच उंचीवरील एखादे विकास काम (शोभेची कमान) करावयाचे झाल्यास काही भागातील विज पुरवठा खंडित करून घेणे आवश्यक असते. परिणामी, त्या भागातील नागरिकांच्या रोषास नगरपरिषदेस सामोरे जावे लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करून शहरात ज्या ठिकाणी भूमिगत विजवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत त्या त्वरित कार्यान्वित कराव्यात. जेणेकरून सध्या पावसाचे दिवस आहेत. वादळी पावसामुळे झाडाच्या फांद्या किवा झाड पडून विद्युत तारांचे होणारे नुकसान टळेल आणि विजपुरवठाही सुरळीत सुरू राहील, अशा आशयाचे पत्र वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वेंगुर्ला उपअभियंतांना दिले आहे.