सावंतवाडी वनविभागाच्या अखत्यारित येत असलेल्या निसर्गरम्य आंबोली घाट व धबधबा परिसराची सावंतवाडी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचायांनी मिळून सामूहिक स्वच्छता केली. या मोहिमेंतर्गत घाट सुरू होण्याच्या ठिकाणापासून ते अंदाजे दहा किमी अंतराच्या रस्ता दुतर्फा परिसराची स्वच्छता करण्यात आली. उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी आणि सहाय्यक वनसंरक्षक डॉ.सुनील लाड यांच्या संकल्पनेतून जैवविविधतेने नटलेल्या आंबोली घाट व धबधबा यांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने निसर्गावर घाला घालणाया कच-याचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली.
दरम्यान, आंबोली घाट व धबधबा परिसरात अस्वच्छता करणे, माकड / वानर यांना खाऊ घालणे यासाठी १ हजार रूपयांचे उपद्रव शुल्क आकारण्यात येणार आहे. राखीव संवर्धन क्षेत्र असलेल्या आंबोली घाटातील जैवविविधता टिकविणे,अनिर्बंधित पर्यटनाला चाप लावणे तसेच माकडांना खाऊ घालण्यामुळे त्यांच्या मानवावरील हल्ले व सवयींमध्ये होणारे बदल रोखणे यासाठी हे कडक निर्बंध वनविभागाने लागू केल्याचे जिल्ह्याचे उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी यांनी सांगितले.