राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने आपल्या परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाणीव जागृती कार्यशाळांची मोहीम सुरू केलेली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून कला, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाया विद्यार्थ्यांना या धोरणानुसार अभ्यासक्रम निवडण्याची संधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन जाणीवजागृती कार्यशाळांचे आयोजन केले आहे. त्यानुसार यूजीसी मालवीय मिशन टीचर्स ट्रेनिंग सेंटरच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुसरी दोन दिवशीय कार्यशाळा मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात १८ व १९ जून रोजी घेण्यात आली. उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉ.अजय भामरे यांच्या हस्ते झाले. यावेळी कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, मुंबई विद्यापीठाच्या कॉमर्स विभागाच्या अधिष्ठाता डॉ.कविता लघाटे, सहयोगी अधिष्ठाता डॉ.रविकांत सांगुर्डे, अण्णा लिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्र पाटील, विद्यापीठाच्या रत्नागिरी सब कॅम्पसचे प्रमुख डॉ.पांडुरंग पाटील, पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप भारमल, मालवण न.प.चे अधिकारी श्री.परब आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि प्राध्यापक यांच्यासाठी असणाया पहिल्या सत्रात डॉ.कविता लघाटे यांनी मार्गदर्शन केले आणि प्राध्यापकांच्या शंकांचे निरसन केले. डॉ.रवींद्र पाटील यांनी दुसया सत्रात उपस्थित सर्व प्राध्यापकांना व प्राचार्यांना स्वयंपोर्टल, इ कंटेंट डेव्हलपमेंटसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. नव्याने प्रवेश घेणाया सर्व विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम, मेजर, मायनर विषय, श्रेयांक पद्धत, मल्टिपल एन्ट्री, मल्टिपल एक्झीट, नवीन परीक्षा पद्धती याबाबत तिस-या सत्रात डॉ.रविकांत सांगुर्डे यांनी सखोल माहिती दिली. चौथ्या सत्रात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. त्यांना डॉ.सांगुर्डे आणि डॉ.लघाटे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील भारतीय ज्ञान परंपरा, विविध व्हर्टिकल्स, श्रेयांक संकल्पना, ऑन द जॉब ट्रेनिंग इ. संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. सुमेधा नाईक यांनी सूत्रसंचालन तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कक्ष समन्वयक डॉ. उज्वला सामंत यांनी आभार मानले.