ज्येष्ठ शुद्ध षष्ठी, बुधवार 12 जून 2024 रोजी वेंगुर्ले श्री स्वामी समर्थ आत्मलिंग पादुका मठ येथे प.पु. आनंदनाथ महाराजांच्या समाधी प्रवेशाला 121 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त ‘संचारस्थळे’ या ग्रंथाचे लोकार्पण व पूजन करण्यात आले. प.पु. आनंदनाथ महाराज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळी सकाळी त्यांचे वंशज सचिन वालावलकर यांच्या हस्ते लघुरुद्र करण्यात आला. त्यानंतर दुपारी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
प.पु. आनंदनाथ महाराजांच्या समाधीवर संचारस्थळे ग्रंथ निर्मिती करण्याचे 6 महिन्यांपूर्वी ठरवण्यात आले होते. त्यांच्या आशीर्वादाने तसेच श्री स्वामी समर्थ यांच्या आविष्कारामुळे पूर्ण झालेल्या या ग्रंथाचे पूजन प.पु आनंदनाथ समाधीस्थान व आनंदनाथ स्थापित श्री स्वामी मठात करण्यात आले. श्री आनंदनाथ महाराजांचे पणतू सच्चिदानंद तथा सचिन वालावलकर यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मठाच्या व्यवस्थापक सुनीता सापळे यांना आनंदनाथांचे वंशज सचिन वालावलकर यांनी श्री आनंदनाथ समाधी स्थानावर ‘संचारस्थळे‘ हा ग्रंथ प्रदान केला.