कोकणच्या प्रसिद्ध दशावतार लोककलेवर पहिले संशोधन करीत मुंबई विद्यापिठाची दशावतारात पहिली डॉक्टरेट पदवी संपादन केलेले वेंगुर्ल्याचे सुपुत्र तसेच मुंबई हायकोर्टचे सुप्रसिद्ध वकील अॅड.डॉ.अशोक भाईडकर यांच्या ‘स्पर्श‘ या कांदबरीला २०२४चा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार जाहिर झाला आहे. या पुरस्काराबद्दल डॉ.भाईडकर यांना लवकरच मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
डॉ.भाईडकर यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यांचा वाचक वर्गही मोठा आहे. इंग्रजी साहित्यावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्यांच्याच पुढाकाराने भारतातील पहिले अखिल भारतीय दशावतारी नाट्य संमेलन वेंगुर्ला येथे १५ व १६ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न झाले. या संमेलनात डॉ.भाईडकर यांनी लिहिलेल्या ‘दशावतार‘ या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीचे प्रकाशन दशावतारातील पितामह यशवंत तेंडोलकर, भजनसम्राट भालचंद्र केळुसकर, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, राज्य परिवहन मंडळाचे उपयंत्र अभियंता सुजित डोंगरे, वेंगुर्ला पोलीस स्टेशनचे मनोज परूळेकर यांच्या हस्ते तर ‘स्पर्श‘ या कादंबरीचे प्रकाशन साप्ताहिक ‘किरात‘च्या संपादक सीमा मराठे, अॅड.शशांक मराठे यांच्या हस्ते झाले होते.
‘स्पर्श‘ या कादंबरीत मानवी शृंगाराच्या विविध गोष्टींचे सुंदर वर्णन केलेले असून ‘कौमार्य‘ या विषयावर भाष्य केले आहे. तरूण-तरूणी, पती-पत्नी यांच्या मनामध्ये चाललेल्या विविध प्रकारच्या भावनांचे वर्णन वाचताना ही कादंबरी वाचकांना एका वेगळ्या वळणावर घेऊन जाते. या सर्वांची दखल घेऊन अनुजा सेवा संस्था आणि ए.ए.एन.के वाचनालय यांच्या संयुक्त माध्यमातून ‘स्पर्श‘ या कादबंरीला पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल डॉ.भाईडकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.