रोटरी इंटरनॅशनल ही जागतिक पोलिओ मुक्तीसाठी अविरतपणे कार्यरत असणारी संस्था असून ‘सर्विस अबाव्ह सेल्फ‘ हे ब्रीदवाक्य घेऊन जगातील लाखो रोटरीयन निरपेक्ष वृत्तीने आपली सेवा विविध प्रकारच्या माध्यमातून देत आहेत. या जागतिक संस्थेचा भाग असणारी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन या शहरी व ग्रामीण भागातील जनतेसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविणा-या संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार पदग्रहण अधिकारी व प्रमुख अतिथी माजी प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांनी काढले.
रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या निवडण्यात आलेल्या सन २०२४-२५ साठीच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा ३० जून रोजी वेंगुर्ला येथील स्वामिनी मंडपम् येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे नवनियुक्त प्रेसिडेंट योगेश नाईक, सेक्रेटरी नोटरी अॅड.प्रथमेश नाईक, ट्रेझरर मुकूल सातार्डेकर, क्लब असिस्टंट गव्हर्नर महादेव पाटकर, असिस्टंट गव्हर्नर डॉ.विद्याधर तायशेटे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी झोन सिंधुदुर्ग राजेश घाटवळ, माजी अध्यक्ष शंकर वजराटकर, पंकज शिरसाट आदी उपस्थित होते.
पदग्रहण सोहळ्याची सुरूवात कथ्थक नृत्यांगना निरजा माडकर हिच्या गणेश वंदना नृत्याने झाली. मावळते अध्यक्ष शंकर वजराटकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले. मागील रोटरी वर्षातील राबविण्यात आलेल्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा आढावा घेऊन, डिस्ट्रिक्टगव्हर्नर नासिरभाई बोरसादवाला, एजी सचिन गावडे, डिस्ट्रिक्ट व क्लबचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले. यानंतर नवनियुक्त प्रेसिडेंट योगेश नाईक, सेक्रेटरी अॅड.प्रथमेश नाईक, ट्रेझरर मुकूल सातार्डेकर व बोर्ड ऑफ डायरेक्टरचा पदग्रहण सोहळा पदग्रहण अधिकारी माजी प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी नवीन सदस्य म्हणून उदय दाभोलकर, आंदुर्लेकर व अंकुश गावडे यांचे स्वागत करण्यात आले.
योगेश नाईक यांनी आगामी रोटरी वर्षासाठी आपल्या क्लबमार्फत आयोजित करण्यात येणा-या विविध प्रकारच्या योजनांची घोषणा करून, सर्वांच्या सहकार्याने विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व आरोग्य विषयक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
रोटरी वेंगुर्ला मिडटाऊन परिवारातील यश्वी ठाकूर, प्रिशा नाईक, आर्ची नाईक, भुमी नाईक, विभांशू उबाळे या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या मिळविलेल्या यशानिमित्त त्यांचा कुटुंबीयांसमवेत गौरव करण्यात आला.
अॅड. प्रथमेश नाईक, काजू उद्योजक दिपक ठाकूर व अंकुश गावडे यांचा गौरव शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले. तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर व दिलीप गिरप, अॅड. आनंद बांदेकर यांचा गौरव करण्यात आला. वेंगुर्ला तालुक्यातील प्रत्येक शाळेतील दहावी व बारावीतील प्रथम क्रमांक पटकाविलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
जन्मतः अंध असूनही शास्त्रीय गायन, हार्मोनिअम व तबला या तीन विषयात विशारद पदवी मिळविणारे यंदा पखवाज विशारद परीक्षेची तयारी करणा-या सचिन पालव व सुरक्षित प्रवास सुविधा देणारे एस.टी.ड्रायव्हर गुरूप्रसाद गावडे यांचे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आले.
या सोहळ्याला उपस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोटरी क्लब सावंतवाडी, शिरोडा, बांदा, मालवण, कुडाळ, कणकवली सेंट्रल, सिंधुदुर्ग सेंट्रल यांच्या प्रेसिडेंट सेक्रेटरी व क्लब सदस्यांनी नवनियुक्त प्रेसिडेंट व कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या.