फूटबॉल मैदान, सिंथेटिक ट्रॅकसह प्रेक्षक गॅलरीला हिरवा कंदील

क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून 12 कोटीच्या कामांना मंजुरी

  वेंगुर्ले कॅम्प येथे तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 12 कोटीचा निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी वेंगुर्लातील जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत मंत्री केसरकर यांनी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे या मागणीबाबत पत्रव्यवहार केला. क्रीडा मंत्री बनसोडे यांनी या कामाला तातडीने हिरवा कंदील दाखवला असून निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश क्रीडा मंत्रालयाला दिले आहेत.

   शालेय शिक्षण तथा मराठी राजभाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनानुसार सचिन वालावलकर यांनी क्रीडामंत्री बनसोडे यांची गुरुवार 4 जुलै रोजी सकाळी राजभवन येथे भेट घेतली. यावेळी बनसोडे यांनी या प्रस्तावाला मान्यता देताना प्रस्तावित 12 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याच्या सूचना क्रीडा मंत्रालयाला दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच वेंगुर्त्याच्या क्रीडा संकुलात आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसह अद्ययावत असे फूटबॉल मैदान, 400 मीटरचा सिंथेटिक धावणमार्ग व प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी आदी कामांना गती मिळणार आहे.

   वेंगुर्ले कॅम्प येथे तालुका क्रीडा संकुलाच्या ताब्यातील 11.86 एकर जागा उपलब्ध आहे. या जागेत दीपक केसरकर यांच्याच प्रयत्नामुळे 2016 साली 1 कोटी रुपयांच्या विविध सुविधा उपलब्ध कण्यात आल्या आहेत. यात भव्य अशी प्रशासकीय इमारत, बहुउद्देशीय हॉल, 400 मीटर धावण मार्ग, विविध खेळांची मैदाने इत्यादी सुविधा पूर्णत्वास आल्या आहेत. या संकुलातील सुविधा अधिक अध्ययावत करून वेंगुर्ल्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. वेंगुर्ल्यात धावणे क्रीडा प्रकारात अनेक मुले सहभाग घेत असून त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नाव कमावता यावे यासाठी सिंथेटिक ट्रकची नितांन आवश्‍यकता
आहे.

   वेंगुर्ल्यात फूटबॉल खेळाडूही मोठ्या प्रमाणात असून त्यांनाही योग्य सुविधा मिळत नाहीत. यामुळे या दोन्ही सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच क्रीडा रसिकांना बसण्यासाठी दर्जेदार अशी प्रेक्षक गॅलरीही उभारण्यात यावी, अशी मागणी सचिन वालावलकर यांनी केली होती. मंत्री केसरकर यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत केवळ एका दिवसात या कामांना तत्वताः मान्यता मिळवून दिली आहे.

   इतर प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्यानंतर लवकरच या कामांना सुरूवात होणार आहे. मंत्री बनसोडे यांनी या कामांना तात्काळ हिरवा कंदील दाखवून निधीची पूर्तता करण्याचे आदेश क्रीडा मंत्रालयाला दिल्याने सचिन वालावलकर यांनी मंत्री बनसोडे व मंत्री केसरकर यांचे वेंगुर्लेवासीयांच्यावतीने आभार मानले आहेत.

Leave a Reply

Close Menu