सारस्वत बँक या भारतीय सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेची १०६वी वार्षिक सर्वसाधारण सभा २७ जुलै रोजी प्रा.बी.एन.वैद्य सभागृह, दादर येथे संपन्न झाली. यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी नमूद केले की, बँकेने व्यवसायाचा ८२ हजार कोटींचा टप्पा पार केला असून ३१ मार्च २०२४ रोजी बँकेचा एकूण व्यवसाय ८२,०२४.७७ रू. कोटींवर पोहोचला आहे. यात ४९,४५७.३१ रू. कोटी ठेवींचा आणि ३२,५६७.४६ कोटी कर्जांचा समावेश आहे. बँकेचा ढोबळ नफा ७८६.४३ कोटी आणि निव्वळ करोत्तर नफा गतवर्षीच्या ३५१ कोटींवरून ५०१,९९ कोटी इतका झाला. जो बँकेच्या १०६ वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक व नागरी सहकारी बँकिग क्षेत्राच्या इतिहासात देखील सर्वोच्च म्हणून नोंदविला गेला आहे.
बँकेने भविष्यातील जोखीम नियंत्रणाकरीता १२५ कोटींची अतिरिक्त फ्लोटींग निधींची तरतूद करून देखील निव्वळ नफ्यात झालेली वाढ ही उल्लेखनीय आहे. अशा अतिरिक्त फ्लोटींग निधीची तरतूद करण्याचे प्रयोजन हा सहकारी बँकिग क्षेत्रातील एक अनोखा उपक्रम आहे. ही फ्लोटींग निधीची तरतूद बँकेने जर केली नसती तर बँकेचा निव्वळ नफा हा ६२८ कोटी इतका झाला असता.
गतवर्षीप्रमाणे अहवाल वर्षीसुद्धा ग्रामीण भागातील सरकारी शाळांची देखभाल व पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी बँकेने सुमारे ५० हून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरूस्ती आणि नूतनीकरणाच्या उपक्रमाकरीता आर्थिक मदत केली आहे.