शिरोडा-वेळागर येथील गावठाण क्षेत्रातील ‘ताज‘ प्रकल्पांतर्गत आरक्षित करण्यात आलेले नऊ हेक्टर क्षेत्र वगळण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांची आहे. या प्रकल्पासाठी आरक्षित केलेल्या जागेतील ९ हेक्टर क्षेत्रात लोकवस्ती असल्याने हे क्षेत्र पर्यटन प्रकल्पातून वगळावे, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. याबाबत सरकारकडून न्याय मिळावा या उद्देशाने लढ्याचे सल्लागार जयप्रकाश चमणकर यांच्या नेतृत्वाखाली वेळागरवाडी शेतकरी संघटनेच्या पदाधिकायांनी पालकमंत्री चव्हाण यांची कुडाळ येथे भेट घेतली. यावेळी माजी आमदार राजन तेली, लढ्याचे सल्लागार जयप्रकाश चमणकर, शिरोडा-वेळागरवाडी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू आंदुर्लेकर, हनुमंत गवंडी, उपाध्यक्ष शेखर नाईक, विनोद आरोसकर, दाजी आरोसकर, भानुदास गवंडी, राजेश नाईक आदी उपस्थित होते.
वेळागर येथील ताज समुहाच्या पर्यटन प्रकल्पासाठी भूमी संपादनप्रश्नी भूमिपूत्रांची बाजू योग्य असून आपणही जनतेच्या बाजूनेच राहणार आहे. याप्रकरणी सर्व बाबींची माहिती घेतली असून लवकरच हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी निर्णय घेण्यात येईल. यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वेळागरवासीयांच्या शिष्टमंडळाला दिले.