वेंगुर्ला प्रादेशिक फळसंशोधन केंद्रात सिधुरत्न समृद्धी योजनेंतर्गत शेतीसह कृषी विकासासाठी कृषी आर्मीचे प्रशिक्षण घेतलेल्या 80 विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांना येणाऱ्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने चर्चासत्र घेण्यात आले. सिधुरत्न समृद्धी योजनेंतर्गत कृषी आर्मी (फुड सिक्युरिटी आर्मी) प्रशिक्षणातून निर्माण केलेली आहे. ही आर्मी शेतीच्या सर्वांगिण विकासाबरोबरच स्वतःचे व शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढीसाठी आहे. जसे आर्मी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून काम फत्ते करून येते. तसेच भातशेतीसह अन्य कृषी उत्पन्न देणाऱ्या विविध पिकांसाठीची सेवा शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करा. महाराष्ट्राला या कृषी आर्मीचा अभिमान वाटला पाहिजे असे काम करा, असे आवाहन सिधुरत्न समृद्धी योजनेचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. यावेळी कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत, सिधुरत्न योजनेचे अधिकारी सुरज परब, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या डॉ.व्ही.एस.देसाई, श्री.शेटये, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर, योगेश तेली, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर आदी उपस्थित होते.
या चर्चेत सिधुदुर्ग जिल्ह्यात कृषी आर्मी म्हणजे अन्न सुरक्षा दल नावाने कृषी विकास अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्य 80 विद्यार्थ्यांनी केलेल्या गटांसंदर्भात अधिकारी सुरज परब यांनी माहिती दिली. यात वेंगुर्ला तालुक्यात मठ, वायंगणी, अणसूर-पाल, आडेली-वजराट, उभादांडा, वेंगुर्ला अशा सहा आर्मी गटांची स्थापना, दोडामार्ग तालुक्यात कोलझर व शिरवल-घोटगे असे दोन आर्मी गट, कुडाळ तालुक्यात हळदीचे नेरूर, बिबवणे, आवळेगाव असे तीन आर्मी गट आणि सावंतवाडीत एक आर्मी गट तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.