अनेक वर्ष प्रलंबित असलेले सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी तिन दिवस घेण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये तिन्ही मतदारसंघातील मिळून जिल्ह्यातून विक्रमी ११४७ तक्रार अर्ज प्राप्त झाले. त्यातील ६३१ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून ५१६ तक्रारी शिल्लक राहिल्या आहेत. शिल्लक राहिलेल्या सर्वच तक्रारी सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असून विधानसभा निवडणूक लांबल्यास तक्रारींचा फॉलोअप घेण्यासाठी २५, २६, २७ सप्टेंबर रोजी पुन्हा जनता दरबार घेतला जाईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलकडे जाणाया वाटेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मुलांना कसरत करूनच वाट काढत स्कूलमध्ये जावे लागते. त्यामुळे स्कूलकडे जाणाया वाटेसाठी जागेचा प्रश्न सोडवावा, यासाठी उभादांडा ग्रामस्थ व स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा नियोजन सभागृहाच्या पाययांवरच बसत ठिय्या आंदोलन करत जनता दरबारात तक्रार अर्ज सादर केला. संबंधित जागेवर जाऊन अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करतील व त्यानंतर वाटेच्या जागेचा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री चव्हाण यांनी ग्रामस्थांना दिले.