दिव्यांग प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस गाड्यांमध्ये कायमस्वरूपी आसन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता कोणत्याही थांब्यावर दिव्यांग प्रवासी बसमध्ये चढल्यास त्यांना आरक्षित असलेले आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बसमधील वाहकाची असणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे नेहमी प्रवास करणाया दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रूपाली पाटील यांनी व्यक्त केली आहे. नव्या परिपत्रकानुसार साध्या बसमध्ये ३, ४, ५ व ६ नंबरचे आसन तर नीमआराम बस -मध्ये ३ व ४ नंबरचे आसन दिव्यांगांसाठी राखीव असणार आहे.