प्रत्येक नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे तसेच पर्यावरणाचा समतोल साधला जावा यासाठी संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान, निर्मलग्राम अभियान, भारत स्वच्छ मिशन अभियान सुरू करण्यात आले आहे. यासाठी शासनाकडून लाखो रूपयांचे पुरस्कारही देण्यात आले. मात्र, केंद्र सरकार असो वा राज्य सरकार यांनी अनेकवेळा गौरविलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील अनेक पुरस्कार प्राप्त परूळे गावामध्येच मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या लाखो रूपयांच्या निधीला हरताळ फासल्याचे चित्र दिसत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छता स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यातील काही गावे सहभागी झाली होती. अशा गावांचे केंद्रस्तरीय समिती व राज्य समितीमार्फत मूल्यांकन करून विविध पुरस्कार देण्यात येतात. समिती येण्याच्या कालावधीत गावात साफसफाई जोरात करण्यात येते. मात्र, त्यानंतर कचरा उघड्यावर फेकल्याने मुक्या जनावरांना या नाशवंत कचयाचे बळी जावे लागते. केवळ देखावा म्हणून पुरस्कारासाठी गावात स्वच्छता होत असेल तर त्याचा गावाला काय फायदा, ही स्वच्छता कायमस्वरूपी असावी असे मत गावातील सूज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.