मालवण-कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांच्या बागेतून हापूस आंब्याची पहिली पेटी नाशिकला पाठविण्यात आली आहे. चार डझन आंब्याच्या या पेटीला २५ हजार रूपये दर मिळाला आहे. जुलै-ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसात आलेल्या मोहोरांचे प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी संरक्षण करून उत्पादन घेतले आहे. आंब्याची पहिली पेटी पाठविण्याचा मान त्यांनी चौथ्यांदा मिळविला आहे.
सिंधुदुर्गात यावर्षी ६ जून ते अजूनपर्यंत अधूनमधून मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र, अशाप्रकारे प्रतिकूल वातावरण असताना कुंभारमाठ येथील श्री. फोंडेकर यांच्या बागेत जुलै, ऑगस्टमध्ये हापूस आंब्याच्या काही झाडांना मोहोर आला होता. श्री. फोंडेकर यांनी या मोहोरांचे संरक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकवर्षी ते काही झाडांवरील मोहोरांचे संरक्षण करीत असतात. केवळ सेंद्रीय किटकनाशकांचा वापर करून त्यांनी हा मोहोर टिकविला. त्यातून आता त्यांना दोन ते तीन पेटी आंबा उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे. यातील पहिली चार डझन आंब्याची पेटी पाडव्याचा मुहूर्त साधत त्यांनी नाशिक येथील ग्राहकाला थेट विक्री केली. या ग्राहकाकडून त्यांना २५ हजार रूपये दर दिला. आणखी पंधरा ते वीस दिवसांनी आणखी चार डझन आंबा उत्पादन त्यांना मिळेल, अशी अपेक्षा आहे. या पिकाचे संरक्षण करण्यासाठी श्री.फोंडेकर यांनी वेंगुर्ला येथील अजित परब यांनी तयार केलेल्या ‘कल्की‘ या संजीवकाचाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली वापर केला. श्री. फोंडेकर यांनी यापूर्वी तीन वेळा सर्वप्रथम आंबा पेटी पाठविण्याचा मान मिळविला होता. आता चौथ्यांदा त्यांनी पेटी पाठविली आहे.
पावसाळ्यात मोहोर आलेल्या तीन चार झाडांवरील मोहोराचे संरक्षण करण्याचा मी दरवर्षी प्रयत्न करतो. आतापर्यंत तीनदा राज्यातून सर्वप्रथम आंबा पेटी पाठविण्याचा मान मला मिळाला आहे. आता चौथ्यांदा हा मान मिळाला. केवळ सेंद्रीय किटकनाशकांचा वापर करून हे उत्पादन घेतले आहे.
– उत्तम फोंडेकर, आंबा बागायतदार, मालवण