जिल्हाधिकारी यांनी बालगृहातील मुलांसमवेत केली दीपावली साजरी

बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या सोबत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिवाळी सण साजरा केला. दीपावली हा सण अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा उत्सव असून मुलांसोबत दिवाळी साजरी करतांना मला खूप आनंद झाल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगत बालकांच्या सोबत दीपावली फराळाचा आस्वाद घेऊन बालकांचा आनंद द्विगुणीत केला. यावेळी संस्थेतील सर्व बालके उत्साही व आनंदी झाली. जिल्हाधिकारी यांनी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कर्मचारी हे सामाजिक भावनेतून योगदान देत असल्याने सर्वांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. संगीत विशारद संजय दळवी व सहकारी यांच्यामार्फत बालकांसाठी संगीत भजन व गायनाचा कार्यक्रम सादर केला.

      यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी संस्थेतील बालकांचे शिक्षण व व्यक्तिमत्व विकास व त्यांचे व पुर्नवसन याबाबत संस्था सतत सकारात्मक प्रयत्नशील असल्याचे मत व्यक्त केले. तसेच कर्नल एन.सी.सी. दिपक दयाळ यांनी बालकांच्या चेह­यावरील हास्य व बालकांची घेण्यात येणारी काळजी हिच खरी दीपावली असल्याचे मनोगत व्यक्त केले.

      बाल कल्याण समिती सदस्य अॅड. पणदुरकर यांनी दीपावली सणाचे महत्त्व सांगून हा सण आपल्या सर्वांसाठी मांगल्याचा, तेजोमय दीप असल्याचे सांगितले. यावेळी समिती सदस्या माया रहाटे यांनी बालक हा समाजामधील महत्त्वाचा घटक असून बालकांचे संरक्षण करणे व त्यांचा विकास हाच दीपावली सणाचा आनंद असल्याचे सांगितले.

      जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी महिला व बाल विकास विभागातील अधिकारी व कर्मचारी हे बालकांचे हक्क व संरक्षण अबाधित राहण्यासाठी कार्य करीत आहे. एकात्मिक बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन, समुपदेशन केंद्रे, सखी वन स्टॉप सेंटर तसेच शासकीय बालगृहे व महिला राज्यगृहे या सारख्या यंत्रणा बहुमुल्य योगदान देत आहे. संस्थेत दाखल झालेल्या बालकांचे जीवन प्रकाशमय होत असून कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले.

      सामाजिक भावनेतून उपस्थित प्रशासकिय अधिकारी, तसेच समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांनी बालकांचे औक्षण करुन भेटवस्तु व दीपावलीचा फराळ देण्यात आला. या प्रसंगी महिला व बाल विकास विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, बाल न्याय मंडळाचे सदस्या कृतिका कुबल, बाल कल्याण समिती सदस्या नम्रता नेवगी, प्रा.अमर निर्मळे, अॅड.पणदुरकर, प्रा.माया रहाटे, संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य सुभाष बांबुळकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी, विशेष शिक्षक संतोष देसाई, डायटविभागाचे श्रीम.पेडणेकर, एन.सी.सी. कर्नल दीपक दयाळ, जिल्हा परिषदचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी आदी मान्यवर व बहुसंख्येने कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन संस्था अधिक्षक तथा जिल्हा परिविक्षा अधिकारी बी.जी. काटकर यांनी केले. समुपदेशक स्वाती पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Close Menu