नुकताच देशात ७५ वा संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधान तयार करण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना २ वर्षे ११ महिने १८ दिवस लागले. त्यांनी अथक परिश्रमानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ते पूर्ण करण्यात आले व २६ जानेवारी १९५० पासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली. म्हणून हा दिवस सन २०१५ पासून भारत सरकारने संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले.
संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. पाश्चात्य सांस्कृतिक युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रूजवणे हा ‘संविधान दिन‘ साजरा करण्यामागचा प्रमुख हेतू आहे. आपल्या देशावर १५० वर्ष राज्य करून ब्रिटिश राजवट मावळत गेली, अशावेळी देशात राहणाया सर्व धर्मियांमध्ये एकता, समानता टिकवून ठेवणे गरजेचे होते. त्यासाठी संविधानाची देशाला आवश्यकता वाटू लागली. देश एकसंघ व्हावा आणि जनतेमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्वांना हक्क मिळावेत यासाठी स्वतंत्र भारतात संविधानाची गरज निर्माण झाली. संविधानामुळे आपण स्वातंत्र देशाचे नागरिक आहोत. संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणून काम करून आपले हक्क बहाल करत असले तरी त्यात दिलेली मूलभूत कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देतात. यासाठी हा दिवस राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो.
संविधान दिनानिमित्त संविधानाची महती घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. लोकशाही राष्ट्रासाठी देशातील नागरिकांचे हक्क व कर्तव्ये परिभाषित केलेली असतात. देशाची शासन व्यवस्था व राज्य चालविण्यासाठी संविधानाची प्रामुख्याने गरज असते. भारताचे संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे. त्याचे बरेच भाग किगडम, अमेरिका, जर्मनी, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि जपान इ. देशांच्या संविधानातील घेतले आहेत, यामध्ये देशाचा कारभार कसा करावा याबद्दल घटनाकारांनी मार्गदर्शन केले आहे.
घटना ही संवैधानिक वर्चस्व प्रदान करते आणि लोकांनी ते प्रस्तावनेत घोषणेसह स्वीकारले आहे म्हणून संसद संविधानाला डावलू शकत नाही. संविधानात भारताला सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते. येथील नागरिकांना न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधूत्व याला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते. असे संविधान लिहिणारे आणि शोषित पिडीतांचे उद्धारक डॉ. आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. हा संपूर्ण भारतीय दलित, शोषित, वंचित, बहुजनांच्या जीवनातील काळाकुट्ट दिवस. जो समाज हजारो वर्षें कर्मठ वैचारिकतेच्या गुलामगिरीत जखडला गेला होता, ज्या समाजाला माणूसपणाची वागणूक दिली जात नव्हती, गांवकुसा बाहेर ज्या समाजाला बहिष्कृत केलं होतं, ज्यांना पशुपेक्षाही हीन दर्जाची वागणूक दिली जात होती त्या समाजाच्या जीवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रकांड पांडित्याच्या जोरावर प्रकाश आणला. त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवलं. इतर समाजाबरोबर प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले, समस्त भारतीयांच्या उद्धाराचे काम केले व जगातील महान राज्यघटना लिहून देशाला अर्पण केली की, ज्या आधारे गेली ७५ वर्षांहून अधिक काळ देशाचा राज्य कारभार हाकला जात आहे व या पुढे ही हाकला जाईल.
स्वातंत्र्य मिळाल्या नंतरच्या ७५ वर्षात देशातील राजकिय, सामाजिक व आर्थिक परिस्थिती बिघडत चालली आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. भ्रष्टाचाराला शिष्टाचार मानत देशाच्या आर्थिक नाड्या काही ठराविक भांडवलदारांच्या हाती सोपवण्यात आल्याने देशात आर्थिक विषमतेची दरी दिवसेंदिवस रूंदावत आहे. डॉ. आंबेडकरांनी भारतीय संविधान बनविताना ज्या स्वातंत्र्य, समता, बंधुता व धर्मनिरपेक्षता या महान तत्त्वांचा अवलंब केला त्यामागे त्यांच्या समोर हे जनतेचे राज्य बनावे हा विशाल व विधायक दृष्टिकोन होता की, जो आजच्या काळात हरवत चालला आहे. दुर्दैवाने आजचे शासन व प्रशासन समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असणाया सर्वसामान्यांना आजवर योग्य न्याय देऊ शकलेले नाही ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची व चिंतनाची बाब आहे याचा विचार होणे गरजेचे आहे. केवळ संविधान दिन साजरा करून आपले कर्तव्य संपत नाही तर उलट जबाबदारीत वाढ होते. त्याप्रमाणे कार्यवाही होणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने आज घडीस प्रशासनाची व शासनाची विश्वासार्हता संशयास्पद दिसून येते. देशात सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, वैचारिक, आर्थिक व शैक्षणिक भ्रष्टाचारात वाढ होताना दिसते या विरोधात योग्य कार्यवाही होणे गरजेचे आहे, तरच सर्वसामान्य माणूस लोकशाहीची गोड फळे चाखताना दिसेल व संविधानाचे महत्त्व प्रतिबिबित होईल आणि हिच त्यांना खरी आदरांजली होईल. – संजय तांबे, फोंडाघाट , मोबा. ९४२०२६१८८८